वेळेत बिल न भरल्यास कनेक्शन तोडणार
हेस्कॉमची ग्राहकांना सूचना : 30 दिवसांत बिल न भरल्यास थेट कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमकडून प्रत्येक महिन्याला विद्युतबिल दिले जाते. परंतु मागील काही दिवसांपासून विद्युतबिल वेळच्यावेळी भरले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे हेस्कॉमने अशा ग्राहकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. बिल आल्यापासून 30 दिवसांच्या आत वीजबिल न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
घरगुतीसह व्यावसायिक, तसेच घर बांधकामाठी दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी विद्युतबिल दिले जाते. हे विद्युतबिल 30 दिवसांत न भरल्यास ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. वारंवार आवाहन करूनदेखील अनेक ग्राहकांनी विद्युतबिल न भरल्याने कारवाई केली जाणार आहे.
वेळेत बिल भरण्याचे आवाहन
यापूर्वी थकीत विद्युतबिलासाठी हेस्कॉमचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिल भरायचे आहे, अशी सूचना करत होते. परंतु यापुढे 30 दिवसांत बिल न भरणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. बिल प्रलंबित राहिल्यास कनेक्शन तोडले जाणार आहे. विद्युतबिल दिल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत बिल भरल्यास कोणत्याही दंडाशिवाय बिल दिले जाईल. परंतु त्यापुढील पंधरा दिवसांत बिल भरल्यास काही प्रमाणात दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत विद्युतबिल भरावे, असे आवाहन हेस्कॉमने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
हेस्कॉमच्या हुबळी कार्यालयाकडून आदेश
ग्राहकांना वारंवार सूचना करून देखील वीजबिल थकविले जात आहे. त्यामुळे यापुढे बिल दिल्यापासून 30 दिवसांत थकीत बिल न भरल्यास कनेक्शन तोडले जाणार आहे. तसा आदेश हेस्कॉमच्या हुबळी येथील कार्यालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत बिल भरणे गरजेचे आहे.
विनोद करुर (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम ग्रामीण)