खानापूर उर्दू शाळेत ‘त्या’ मुख्याध्यापिकेला हजर केल्यास टाळे
जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे एसडीएमसी-पालकांचा इशारा : योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन
खानापूर : येथील सरकारी उर्दू उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून यास्मिन तहसीलदार यांची बदली केली आहे. या शिक्षिकेविरोधात उर्दू शाळेच्या एसडीएमसी व पालकानी उर्दू शाळेत हजर करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षणाधिकारी लीला हिरेमठ व गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांना दिले आहे. मात्र पुन्हा या शिक्षिकेची बदली खानापूर उर्दू शाळेत केल्याने गुरुवारी एसडीएमसी सदस्य, पालकानी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून शिक्षिकेला शाळेत हजर करून घेणार नसल्याचे जाहीर करून जर शिक्षिकेला हजर केल्यास शाळेला टाळे ठोकू असा इशारा यावेळी दिला. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील व्यवस्थापक होसमणी यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
यास्मिन तहसीलदार या यापूर्वीही कार्यरत होत्या. मात्र त्यांच्या कार्यपद्धती विरोधात पालकानी फेब्रुवारी 2023 मध्ये आंदोलन छेडून मुख्याध्यापिकेच्या बदलीची मागणी लावून धरली होती. त्यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यानी खातेनिहाय चौकशी करून या शिक्षिकेचे निलंबन केले होते. व तालुक्यातील रामापूर येथील उर्दू शाळेत बदली केली होती. पुन्हा जिल्हास्तरीय बदलीच्या कौन्सिलिंगवेळी यास्मिन यांनी खानापूर येथील उर्दू शाळेत बदली करून घेतली. हे एसडीएमसी कमिटी, पालकांच्या निदर्शनास आल्यावर पालक व एसडीएमसी सदस्यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तहसीलदार यांना खानापूर उर्दू शाळेत हजर करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन दिले होते. याबाबत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यानी तसे निर्देश खानापूर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकानी आजपासून शाळा सुरू झाल्यावर खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करून मुख्याध्यापिकेना खानापूर शाळेत हजर करण्यात येऊ नये, अशी मागणी लावून धरली.
‘त्या’ मुख्याध्यापिकेबाबत भीती
यापूर्वी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच वर्गात भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे. एसडीएमसी कमिटी व पालकांचा विरोध असताना जाणीवपूर्वक खानापूर उर्दू शाळेत हजर होण्यासाठी मुख्याध्यापिकेचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश डावलून गणतीसाठी राज्यभरात शिक्षकांच्या बदल्याना स्थगिती असताना जाणीवपूर्वक गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून आर्थिक साटेलोटे करून बदलीचे आदेश दिले आहेत. असा आरोप पालकानी यावेळी केला. बदली रद्द करून तेथे दुसऱ्या मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी. जर त्या मुख्याध्यापिका शाळेत हजर झाल्यास शाळेला टाळे ठोकू असा इशारा दिला आहे. निवेदन देताना एसडीएमसी अध्यक्ष अबिद मुजावर, अहमद बागवान, नसरुल्ला बस्तवाडकर, मुबारक हट्टीहोळी, वहीदखान फठाण, जीशान अत्तार, दादाफीर मुजावर, शहाबुद्दीन मकानदार, असीफखान पठाण, यासीन दफेदार, सलीम मकानदार, हिदायत दफेदारसह पालक, हितचिंतक उपस्थित होते.