For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखर कारखाने अडचणीत मग परवान्यांसाठी लाईन कशी?

11:56 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
साखर कारखाने अडचणीत मग परवान्यांसाठी लाईन कशी
Advertisement

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्याकडून सरकारची कोंडी, उत्तर कर्नाटकावरील चर्चेवेळी दीड तास सडकून टीका

Advertisement

बेळगाव : बेळगावसह कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात आहे. ऊस उत्पादनामुळे केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर सरकारचाही फायदा आहे. ऊस उत्पादकांना संकटातून वाचविण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी विधानसभेत केली. उत्तर कर्नाटकावरील चर्चेत भाग घेत कारखाने संकटात आहेत, अडचणीत आहेत तर नव्या कारखान्यांसाठी अर्ज कसे येत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकात 81 साखर कारखाने आहेत. 9.81 लाख हेक्टर ऊसपट्टा आहे. कारखानदार अडचणीत आहेत, अशी ओरड सुरू आहे. मात्र, 32 नव्या कारखान्यांसाठी सरकारसमोर अर्ज आले आहेत. साखर कारखाने अडचणीत असतील, साखर व्यवसाय संकटात असेल तर नव्या कारखान्यांसाठी अर्ज कसे आले? एफआरपीच्या वर दर द्यायचा असेल तर ते राज्य सरकारने द्यावे, असे उत्तरप्रदेशमधील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याकडेही आर. अशोक यांनी सरकारचे लक्ष वेधले.

Advertisement

तब्बल दीड तासांहून अधिककाळ आर. अशोक यांनी उत्तर कर्नाटकावरील अन्यायाला वाचा फोडली. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान,भरपाई देण्यास सरकारकडून झालेला विलंब याचा उल्लेख करीत घरांची पडझड झाल्यानंतर आम्ही पाच लाख रुपये भरपाई देत होतो. आता केवळ 95 हजार रुपये दिले जात आहेत. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखविले जाते, असे सांगतानाच सरकारची दिशाभूल करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. सर्वेक्षण करताना महसूल खाते सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकताना काटामारी थांबली नाही, मापात पाप केले जात आहे,स्वत:च वजनकाटे बसविण्याची सरकारची घोषणा प्रत्यक्षात आली नाही, मुधोळ तालुक्यातील सैदापूर येथे आंदोलनावेळी 250 ट्रॅक्टर, पाचहून अधिक मोटारसायकली, 1033 टन ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सरकार जिवंत असते तर अशी घटनाच घडली नसती, अशी टीकाही त्यांनी केली.

इडली-वडा खाऊन समस्या सुटत नाहीत!

उत्तर कर्नाटकावरील चर्चेत काँग्रेसमधील सत्तासंघर्षाचाही उल्लेख झाला. आपणच पाच वर्षे मुख्यमंत्री असणार, असे सिद्धरामय्या सांगत आहेत. आपण सोडणार नाही, असे डी. के. शिवकुमार यांचे म्हणणे आहे. इडली-वडा खाऊन समस्या सुटत नाहीत. नेतृत्वाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत विकासाला गती मिळत नाही. लाथ मारून सत्ता मिळवली, असे गेल्या अधिवेशनात डी. के. शिवकुमार यांनी याच बेळगावात सांगितले होते. या सत्तासंघर्षामुळे अधिकाऱ्यांचे फावल्याचा आरोपही आर. अशोक यांनी केला.

दंडाला काळी फीत बांधून अरविंद बेल्लद सभागृहात

बुधवारच्या कामकाजात विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी आपल्या दंडाला काळी फीत बांधून सहभागी झाले होते. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी यासंबंधी त्यांना विचारणा केली. काळी फीत कशासाठी? असे विचारताच गेल्या अधिवेशनावेळी 10 डिसेंबर रोजी आपल्या समाजबांधवांवर लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आपण काळी फीत बांधल्याचे त्यांनी सांगितले. यावर एच. के. पाटील यांनी सभागृहाचे नियम सांगत झेंडे, निशाण, काळी फीत बांधणे नियमबाह्या आहे, असे सांगताच अरविंद बेल्लद यांनी आपल्या दंडाला बांधलेली काळी फीत काढली.

Advertisement
Tags :

.