कर्नाटकने म्हादई वळविल्यास गोव्याचे होणार वाळवंट
कर्नाटकचाही ऱ्हास आणि महाराष्ट्रालाही बसेल झळ : काँग्रेसच्या सादरीकरणातून समोर आले भयानक सत्य
प्रतिनिधी/ पणजी
म्हादई वळविण्यापासून कर्नाटकला रोखले नाही तर गोव्याचे वाळवंट होईल आणि कर्नाटकचाही ऱ्हास होईल, एवढेच नव्हे तर त्याची झळ महाराष्ट्रालाही बसेल, काही वर्षांनी तिन्ही राज्यांच्या जंगलांमध्ये वणवे पेटू लागतील, हे सर्व एका म्हादई नदीमुळे होईल आणि त्यातूनच गोव्याचे अस्तित्वच संपून जाईल, असा गंभीर इशारा काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिला आहे. याप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन कर्नाटकला रोखणे हाच पर्याय शिल्लक राहिला असून त्यावर आताच गांभीर्याने निर्णय न झाल्यास भावी पिढ्यांना दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.
शनिवारी पणजीत काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सिवियो डिसिल्वा, वीरेंद्र शिरोडकर, आदींची उपस्थिती होती. मानव जातीच्या उत्पत्तीपूर्वीपासून नद्या अस्तित्वात आहेत. अशावेळी त्यांचे प्रवाह वळविणारे आम्ही कोण? तसेच कुणाचाही सल्ला न घेता आणि कुणाचाही आदेश नसताना म्हादईसंदर्भात अहवाल निर्माण करण्याचा अधिकार एनआयओला कुणी दिला? आदी गोष्टींचा विचार झाला पाहिजे, असे कॅ. विरियातो म्हणाले.
म्हादईसंदर्भात अहवाल निर्माण करणाऱ्या एनआयओ अधिकाऱ्यांमध्ये काहीजण कर्नाटकातील आहेत. त्याशिवाय वारंवार सेवावाढ मिळविणारे जलस्रोत मुख्य अभियंता बदामी हेही कर्नाटकातील आहेत. त्यामुळे त्यांना स्वराज्याबद्दल आत्मियता, तळमळ, स्वाभीमान असणे साहजिकच आहे. म्हणूनच त्यांच्याकडून गोव्याला न्याय मिळण्याची शक्यता/अपेक्षा नाही, हेच त्यांनी तयार केलेल्या अहवालातून आणि ‘म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्यात किरकोळ परिणाम होतील’, या दाव्यातून स्पष्टही झालेले आहे, असे कॅ. विरियातो यांनी पुढे सांगितले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अॅन्व्हायरोन्मेंट, नॉर्वेजियन जलसंशोधन संस्था आणि आयआयटी मुंबई यांसारख्या चार नामांकित संस्थांमधील तज्ञांनी केलेल्या सखोल अभ्यासाचा संदर्भ देताना कॅ. विरियातो यांनी म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्याचे वाळवंट बनेल, हेच या अहवालांमधून स्पष्ट होत असल्याचा इशारा दिला.
एनआयओचा अहवाल हा तेथील जलशास्त्रज्ञांनी तयार केला आहे. त्यात पावसाळ्यानंतरच्या म्हादईच्या प्रवाहांचा विचारच केलेला नाही. भंडुरा आणि कळसा येथून वर्षभर वाहणारे पाणी सदाहरित जंगल टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढते जागतिक तापमान आणि पर्यावरणीय ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे संपूर्ण परिसंस्था आणि आपल्या जीवनशैलीलाच गंभीर धोका निर्माण करणारे आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक नदीला स्वत:चा एक प्रवाह आणि लय असते. त्यामुळे नकाशावरील एक रेषा समजून त्यांना कृत्रिमरित्या वळविता येत नाही. त्याशिवाय किनाऱ्याजवळ वाहणारी मांडवी नदी ही गोव्याच्या 43 टक्के लोकसंख्येचा प्राणवायू आहे. अशावेळी म्हादईचा प्रवाह कमी झाल्यास खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्थाच संकटात येईल. त्यातून मानवी समाजाबरोबरच प्राणीजातीवरही परिणाम होईल व वाघ, बिबटे काळे पँथर यासारखे प्राणी थेट गावांमध्ये वावरताना दिसून येतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. म्हणूनच व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने हा एक जागृतीसदृश इशारा आहे, असे विरियातो म्हणाले.
कर्नाटक म्हादई पात्रात तब्बल तीन धरण राबवू पाहात आहे. हे प्रकल्प म्हादई (गोवा) व भीमगड (कर्नाटक) येथील अत्यावश्यक वन्यजीव अभयारण्यांतील पाण्याचे स्त्राsत तोडण्याचे काम करतील. त्यामुळे जैव संवेदनशील विभाग (श्रेणी 1) मध्ये समावेश असलेल्या गोव्यासाठी हा एक गंभीर धोका असल्याचे विरियातो यांनी सांगितले.
प्रत्यक्षात कर्नाटकमध्ये कुठेही पाणीटंचाई नाही. त्यांच्या धारवाड भागात तर अखंड 24 तास पाणीपुरवठा होत असून त्यावर कितीतरी साखर कारखाने आणि रोज एक लाख लिटर पाणी वापरणारा सॉफ्ट ड्रिंक कारखानाही चालत आहे. त्याशिवाय अनेक स्टील उद्योग आणि वीज निर्मिती प्रकल्पही चालत असून तेही मोठ्या प्रमाणात पाणी वापरत असतात. यावरून कर्नाटक जो पाणीटंचाईचा दावा करत आहे, तो खोटा असल्याचे सिद्ध होत आहे, असे विरियातो यांनी सांगितले.