जर आयपीएल चं भलं व्हावं असं वाटत असेल तर आरसीबीला नव्या मालकाला विका भारताचा टेनिसपटू महेश भूपतीची बीसीसीआयला विनंती
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सोमवारी (15 एप्रिल) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर भारताचा टेनिस स्टार महेश भूपतीने बेंगळुरू संघाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बेंगळुरूने आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत 7 सामने खेळले असून त्यातील 6 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच सोमवारी झालेला पराभव बेंगळुरूचा सलग पाचवा पराभव होता. या हंगामात बेंगळुरूला सातत्याने गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका बसताना दिसले आहे. सोमवारी झालेल्या सामन्यातही हैदराबादने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या बेंगळुरूविरुद्ध उभारली. हैदराबादने 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात बेंगळुरूने 20 षटकात 7 बाद 262 धावा केल्या. दरम्यान, या सामन्यातील बेंगळुरूच्या पराभवानंतर भूपतीने पोस्ट करत बीसीसीआयला विनंती केली आहे की बेंगळुरूला एका चांगल्या संघमालकाला विका. भूपतीने लिहिले की 'खेळाच्या, आयपीएलच्या आणि चाहते व अगदी खेळाडूंच्या भल्यासाठी बीसीसीआयने आरसीबीची विक्री एका नव्या मालकाला करणे गरजेचे आहे, जो दुसऱ्या संघांप्रमाणे या संघालाही एक चांगली स्पोर्ट्स फ्रँचायझी बनवण्याची काळजी घेईल.' भूपतीच्या या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट केली असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, बेंगळुरूने आयपीएल 2024 मध्ये 7 सामने गमावलेले असल्याने आता त्यांच्यासाठी स्पर्धेतील पुढील वाट अधिक बिकट झाली आहे. ते प्ले-ऑफच्या शर्यतीतूनही लवकर बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना आपले आव्हान कायम ठेवायचे असेल, तर आता पुढील सामन्यांमध्ये विजयाची आवश्यकता आहे. बेंगळुरूचा पुढील सामना 21 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर होणार आहे.