काँग्रेस आल्यास मुस्लिमांनाच सर्व लाभ
1984 च्या जाहिरातीचा भाजपकडून उपयोग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस देशात पुन्हा सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गियांना सध्या मिळणारे लाभ केवळ मुस्लिमांनाच मिळू दिले जातील, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. काँग्रेस पक्ष हा मुळात हिंदूंमधील मागास समाजघटकांना आरक्षण देण्याच्याच विरोधात आहे, असे प्रतिपादन या पक्षाने केले असून त्याच्या पुष्ट्यार्थ 1984 च्या काँग्रेसच्या जाहिरातीचा उपयोग केला आहे. महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर ही काँग्रेसची जुनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जातींचा विचार वगळून काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन या जाहिरातीत मतदारांना करण्यात आले आहे. आज तीच काँग्रेस जातींच्या आधारावर देशाची विभागणी करण्याची भाषा करीत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी योग्य वेळ येताच आरक्षण संपविले जाईल, अशा अर्थाची भाषा केली होती. त्या गांधींच्या वक्तव्याचा संदर्भही अमित मालवीय यांनी या पोस्टमध्ये दिला आहे.
काँग्रेसच्या मनात नेमके काय
काँग्रेसने अनेकदा मागासांच्या आरक्षणासंदर्भात विरोधाची भूमिका घेतली असून मुस्लिमांचे लांगूलचालन मात्र मोठ्या प्रमाणात केले आहे. याचा अर्थच असा होतो, की हिंदूंमधील मागास समुदायांचे आरक्षण काँग्रेसला मान्य नाही. पण मुस्लिमांना लाभ मिळू देण्यात मात्र तो पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता गेली तर सर्व लाभ एकाच मुस्लीम समुदायाला दिले जातील. हिंदूची अपरिमित हानी होईल, असा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे.