ईडीकडून कारवाई झाल्यास पत्नीला मुख्यमंत्रिपद
हेमंत सोरेन यांचा प्लॅन : आमदाराच्या राजीनाम्यानंतर सत्ताहस्तांतरणाचा मार्ग मोकळा
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे, यामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत. याचदरम्यान गिरिडीहच्या गांडेयचे झामुमो आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी राजीनामा दिल्याने झारखंडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी आमदारांची बैठक बोलाविली असून यात पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सरफराज अहमद यांच्या राजीनाम्याला नव्या पदाधिकाऱ्यासाठी (मुख्यमंत्री) रिकामी करण्यात आलेला मतदारसंघ मानले जात आहे. ईडीकडून अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे पत्नी कल्पना यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविणार असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत कल्पना सोरेन यांच्यावर नावावर सहमती होणार असल्याची चर्चा आहे. ईडी कुठल्याही क्षणी सोरेन यांना अटक करू शकते, अशा स्थितीत नेमके काय करावे याचा विचार झामुमोकडून सुरू आहे.
वैयक्तिक कारणामुळे राजीनामा
राजीनामा देण्याचा निर्णय वैयक्तिक कारणामुळे घेतला आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकार मजबूत रहावे अशी आमची इच्छा आहे. माझा राजीनामा राज्याच्या सर्वोत्तम हितात असल्याचा दावा झामुमोचे माजी आमदार सरफराज अहमद यांनी केला आहे.
भाजपकडून झामुमोवर हल्लाबोल
झारखंडमधील या राजकीय उलथापालथीच्या शक्यतेदरम्यान भाजप नेते बाबुलाल मरांडी यांनी सोरेन सरकावर हल्लाबोल केला आहे. झारखंडमध्ये देखील बिहारच्या जंगलराजच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होतोय. चारा घोटाळ्याचे गुन्हेगार लालूप्रसाद यादव यांचे सर्व डाव उधळले गेल्यावर त्यांनी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केले होते. आता अशाचप्रकारे आदिवासींची जमीन, जंगल, पर्वत लुटून काही काळात प्रचंड बेहिशेबी मालमत्ता जमा केलेले सोरेन पुटुंबाचे राजपुत्र हेमंत सोरेन अडचणीत आलेले आहेत. अशा स्थितीत ते पत्नीला मुख्यमंत्री करून स्वत: तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडत असल्याची टीका मरांडी यांनी केली आहे.
ईडीकडून कारवाईची शक्यता
भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 6 वेळा समन्स बजावला आहे, परंतु एकाही समन्सच्या उत्तरादाखल ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. ईडीने आता सोरेन यांना पीएमएलए अधिनियमाचे कलम 50 अंतर्गत स्वत:चा जबाब नोंदविण्यास सांगितले आहे. सोरेन यांना ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाण निवडण्याची सूचना करण्यात आली होती.