तुरमुरी राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
वार्ताहर / उचगाव
तुरमुरी येथील श्रीराम मंदिर, वास्तुशांती, मूर्ति प्रतिष्ठापना व कळसारोहण आणि माउली अश्वरिंगण सोहळ्यातील पहिला दिवस (शनिवार दि. 20) डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्ती व कळस मिरवणूक ‘श्रीराम जय राम जय जय राम’ च्या जयघोषात निघाली.
सकाळी 11 वाजल्यापासून तुरमुरी गावाच्या प्रवेशद्वारातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्ती व कळस मिरवणुकीला शानदार प्रारंभ झाला. गावातील सर्व गल्ल्यांमधून ही मिरवणूक सवाद्य निघाली. गावाच्या प्रवेशद्वारावरच तसेच प्रत्येक गल्लीच्या प्रारंभीच युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी कमानी उभ्या केल्या होत्या. सुवासिनींनी आपल्या अंगणात व रस्त्यावर रंगीत रांगोळ्या, फुलांचे सडे टाकून अंगण, रस्ता सजविला होता. जागोजागी आंबोत्या, केळीचे मोने, भगव्या पताका, रामाची प्रतिमा असलेले झेंडे, गल्लीतून झळकत होते. भगव्या साड्या परिधान करून कलश घेऊन महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
त्याचबरोबर झांज पथक, ढोल, ताशा अशा धर्तीवर हा मूर्ती व कळस मिरवणुकीचा सोहळा एक आगळावेगळा, गावासाठी लक्षात राहील असा नागरिकांसाठी, भाविकांसाठी वेगळेच आकर्षण ठरत होता.
मिरवणुकीमध्ये ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी व गावातील नागरिक सर्व आपले व्यवहार बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र दिसून येत होते.