ईदगाहच्या घुमटाला धक्का; चौघा जणांना अटक
संतिबस्तवाड येथील घटनेप्रकरणी एक महिन्यानंतर कारवाई
बेळगाव : संतिबस्तवाड (ता. बेळगाव) येथे धर्मग्रंथ जाळल्याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. एक महिन्यापूर्वी याच गावात ईदगाह इमारतीला धक्का पोहोचविल्याच्या आरोपावरून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी रात्री पत्रकारांना ही माहिती दिली. धर्मग्रंथ जाळल्याप्रकरणाच्या चौकशीसाठी आणखी कालावधी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
धर्मग्रंथ जाळल्याप्रकरणी तपास करताना जुन्या प्रकरणातील संशयितांना अटक झाली आहे. 12 एप्रिल 2025 च्या सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी 13 एप्रिलच्या सकाळी 7.30 या वेळेत ईदगाहच्या घुमटाला धक्का पोहोचविण्यात आला होता. त्याबरोबरच काही कबरीवरील फरशा फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पेलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एक महिन्यानंतर चौघा जणांना अटक झाली आहे.
लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे (वय 30), मुत्ताप्पा भरमा उचवाडे (वय 26), लक्ष्मण नागाप्पा नाईक (वय 30), शिवराज मल्लाप्पा गुदली (वय 29 सर्व रा. संतिबस्तवाड) अशी त्यांची नावे आहेत. या चौघा जणांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. हिंडलगा कारागृहात त्यांची चौदा दिवसांसाठी रवानगी करण्यात आली आहे. प्रार्थना स्थळावरून धर्मग्रंथ नेऊन शेतवडीत तो जाळण्यात आला होता. सोमवार दि. 12 मे रोजी ही घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संतप्त मुस्लीम बांधवांनी संतिबस्तवाडकडे कूच केली होती. सायंकाळी राणी चन्नम्मा चौक येथे धरणे धरण्यात आले होते. तीन दिवसात या प्रकरणातील आरोपींना अटक करू, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर धरणे मागे घेण्यात आले होते.
मात्र या प्रकरणाच्या तपासासाठी आणखी थोडा वेळ लागणार. कारण, प्रकरणाच्या खोलवर चौकशी सुरू आहे. यासाठी पाच पथके कार्यरत आहेत. संपूर्ण चौकशीसाठी अवधी लागणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शुक्रवारी मुस्लीम बांधव पुन्हा निदर्शने करणार अशी माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून चौकशी सुरू आहे. आणखी थोडा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.