ओळख ‘डीएनए’ची
अहमदाबाद विमान अपघातातील प्रवाशांचे मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड झाले होते. गुजरातमधील भीषण विमान अपघातानंतर फॉरेन्सिक सायन्सेस संचालनालयाच्या (डीएफएस) दुसऱ्या मजल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे वैद्यकीय अधिकारी व शास्त्रज्ञ डीएनए लॅबमध्ये सतत तपासण्या करत होते. तीन शिफ्टमध्ये दिवस-रात्र चालणारी ही मोहीम भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ओळख-संबंधित डीएनए मोहीम बनली आहे. जळालेल्या मृतदेहांचे अवशेष आणि तुटलेल्या हाडांमुळे हे काम अत्यंत कठीण बनले होते. हे अशक्य काम शक्य करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी ‘डीएनए मॅचिंग’ मोहीम राबविण्यात आली. मृतांचे अवशेष ओळखून त्यांचे डीएनए नातेवाईकांशी जुळवणे आणि त्यांच्या प्रियजनांचे अवशेष योग्य नातेवाईकांकडे सोपविणे हे आव्हानात्मक काम होते. युद्धपातळीवर सुरू असलेले हे डीएनए मॅचिंगचे काम कसे करण्यात आले आणि ही मोहीम कशी राबविण्यात आली, यावर टाकलेली एक नजर...
अहमदाबादहून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे कोसळून मोठी जीवितहानी झाली. विमानातील केवळ एकाच प्रवाशाचे प्राण वाचले. उ•ाणानंतर काही सेकंदातच हे विमान कोसळल्यानंतर आगीचा भडका उडाल्याने क्षणार्धात 1000 अंश सेल्सिअस इतक्या प्रचंड तप्त ज्वाळांनी सर्व काही राख केले. 241 प्रवाशांना विचार करण्याचीही संधी मिळाली नाही. त्यांचे मृतदेह इतके जळून गेले होते की त्यांची ओळख पटविणे अशक्य झाले. हे विमान वैद्यकीय महाविद्यालाच्या वसतिगृहावर कोसळल्यामुळे तेथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स व आजुबाजूचे रहिवासीही आगीच्या विळख्यात सापडले. जवळपास 275 जण या अपघातात ठार झाले. त्यांचे मृतदेह शोधून काढणे आणि ओळख पटविण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
डीएनए तपासणीतून ओळख पटविणे शक्य असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेतच. एकाच दुर्घटनेत एकाच ठिकाणी सापडणारे मृतदेहांचे अवशेष तपासून त्यांची योग्य शहानिशा करण्याची किमया साधणे हे वैद्यकीय तज्ञांसमोर असलेले एक मोठे आव्हानच होते. मात्र, अशक्य असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी डीएनए मॅचिंग मोहीम सुरू करत आतापर्यंत बहुतांश मृतदेहांचे डीएनए नमुने जुळवण्यात वैद्यकीय व तपास यंत्रणांना यश आलेले दिसत आहे. गेल्या पंधरवड्यापासून 40 हून अधिक फॉरेन्सिक तज्ञ, डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी न थांबता, न थकता 24 तास एका अतिशय महत्त्वाच्या मोहिमेत गुंतलेले दिसून आले.
संपूर्ण गुजरातमधील शास्त्रज्ञ एकत्र
देशातील प्रत्येक व्यक्ती अहमदाबाद दुर्घटनेनंतर व्यथित होती. मृतांचे कुटुंबीय अस्वस्थ होऊन दु:खसागरात लोटले गेले. अशा परिस्थितीत लोकांच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन सरकारच्या सूचनेनुसार मृतांची ओळख पटविण्याचे मिशन युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या मोठ्या मोहिमेसाठी पोलीस, प्रशासन, आरोग्य विभाग आणि इतर एजन्सींमधील शेकडो अधिकारी, कर्मचारी, तज्ञ तैनात करण्यात आले. तज्ञ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अहमदाबाद आणि गांधीनगरला तात्काळ पोहोचण्यास सांगण्यात आले. वेळेचा अपव्यय होऊ नये आणि टीम पूर्ण क्षमतेने काम करू शकेल, यासाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
तीन प्रयोगशाळांमध्ये तपासणी कार्य
गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स संचालनालय आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या पथकांनी तातडीने सक्रियता दाखवली. डीएफएस आणि एनएफएसयू संबंधित सुमारे 40 शास्त्रज्ञ या मोहिमेत गुंतले होते. अपघातानंतर लगेचच संपूर्ण ठिकाण सील करून मृतांचे 300 हून अधिक नमुने गोळा करण्यात आले. तीन तासांत नमुने रुग्णालयांमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे राजकोट, सुरत आणि वडोदरा या तीन फॉरेन्सिक सायन्स लॅबमधून डीएनए मॅचिंग किट आणि इतर उपकरणांची व्यवस्था करण्यात आली.
शास्त्रज्ञ, कर्मचाऱ्यांचा ‘कर्तव्यदक्ष’पणा
या मोहिमेत सहभागी असलेले शास्त्रज्ञ केवळ तांत्रिक जबाबदाऱ्याच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक समस्याही मागे सोडून काम करत होते. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने आपल्या आईची हृदय शस्त्रक्रियाही पुढे ढकलली. इतर काही शास्त्रज्ञांनी त्यांच्या लहान मुलांनाही सोडून तात्काळ प्रयोगशाळेत कार्यरत झाले. हे काम तीन शिफ्टमध्ये सतत केले जात होते आणि कोणीही मागे हटले नव्हते. डीएनए मॅचिंगच्या या महान मोहिमेमुळे भारताच्या या क्षेत्रातील कौशल्य खूप प्रगत झाल्याचे दिसून आले आहे.
बीजे मेडिकल कॉलेज रक्त तपासणीचे केंद्र
मृतांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आली होती. फॉरेन्सिक मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि पॅथॉलॉजी विभागातील 50 हून अधिक तज्ञ या कामात गुंतले होते. डीएनए विश्लेषणाचा पुढील टप्पा शक्य तितक्या लवकर सुरू व्हावा, यासाठी जवळजवळ सर्व उपलब्ध संसाधने या रक्त तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
36 तासात पहिला डीएनए जुळला
विमान अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे 250 हून अधिक नमुने घेण्यात आले. तीन फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए काढण्याची आणि मॅचिंगची व्यवस्था करण्यात आली. 40 हून अधिक तज्ञ डॉक्टर ओळख पटविण्यात गुंतले होते. 200 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारीदेखील त्यांना मदत करण्यासाठी गुंतले होते. संपूर्ण टीम दिवस-रात्र काम करत होती. परिणामी, नमुना मिळाल्यापासून अवघ्या 36 तासांत पहिल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
पंधरवड्यात संपूर्ण कार्य पूर्णत्वाकडे
पहिल्या 100 तासात 167 डीएनए मॅचिंग करण्यात आले. तर पहिल्या आठवडाभरात 224 लोकांचे डीएनए जुळविण्यात आले. 204 लोकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले होते. यामध्ये 30 ब्रिटिश नागरिक आणि 4 पोर्तुगीज नागरिकांचाही समावेश होता. मागील 15 दिवसांपर्यंत चाललेल्या या मोहिमेत आतापर्यंत 259 जणांची ओळख केवळ डीएनए चाचणीतून पटविण्यात आली. तर सहाजणांना चेहरापट्टीवरून ओळखण्यात यश आले.
डीएनए चाचणी म्हणजे काय?
► डीएनए किंवा डीऑक्सिरायबोन्यूक्लिक अॅसिड हा शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असलेला कोड आहे, जो एखाद्या व्यक्तीची ओळख निश्चित करतो. तो त्याच्या पालकांकडून प्राप्त होतो. डीएनए चाचणी ही एक वैज्ञानिक पद्धत आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीची ओळख, नातेसंबंध किंवा आजार शोधता येतो.
► डीएनए मॅचिंग सिस्टमला डीएनए प्रोफाइलिंग किंवा डीएनए फिंगरप्रिंटिंग असेही म्हणतात. ही तंत्रे कोणत्याही व्यक्तीच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांवर आधारित व्यक्तींची तुलना करण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी वापरली जातात. हे तंत्रज्ञान कोणत्याही व्यक्तीसाठी एक अद्वितीय अनुवांशिक प्रोफाईल तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या डीएनएच्या विशिष्ट पैलूंचे विश्लेषण करतात.
► संशयितांना गुन्हेगारी घटनास्थळांशी किंवा बळींशी जोडण्यासाठी गुन्हेगारी तपासात डीएनए मॅचिंगचा वापर सामान्यत: केला जातो. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी आढळणारे रक्त, केस किंवा शारीरिक द्रव यासारखे डीएनए पुरावे, संभाव्य संशयितांच्या डीएनए प्रोफाईलशी तुलना करता येतात.
► जेव्हा एखाद्या मृतदेहाची स्थिती इतकी वाईट असते की चेहरा किंवा शरीराची ओळख पटत नाही, तेव्हा मृतदेहाचा डीएनए घेतला जातो आणि तो मृतदेहावर दावा करणाऱ्या नातेवाईकांच्या डीएनएशी जुळवला जातो. जर जुळणी आढळली तर मृतदेहाची ओळख पटवली जाते.
► डीएनए चाचणीसाठी मृतदेहाचे रक्त, हाडे, केस, दात, त्वचा किंवा नखे असे नमुने घेतले जातात. गालाच्या आतील थराचा नमुना (बकल स्वॅब) सहसा जिवंत व्यक्तीकडून घेतला जातो.
► डीएनए तपासणी प्रक्रिया काही तासांमध्ये किंवा दिवसात पूर्ण होत असली तरी अहवाल तयार करण्यास वेळ लागतो. साधारणपणे अहवाल 5 ते 10 दिवसांत मिळतो. परंतु अपघातासारख्या प्रकरणांमध्ये जेव्हा नमुने जळतात किंवा पूर्णपणे खराब होतात तेव्हा 2 ते 3 आठवडे लागतात.
डीएनए चाचणीचा खर्च किती येतो?
डीएनए चाचणीचा खर्च वेगवेगळा असतो. सामान्य ओळख किंवा पितृत्व चाचणीसाठी 6 ते 15 हजार रुपये लागतात. तर फॉरेन्सिक चाचणीसाठी 30 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतही खर्च येऊ शकतो. सरकारी चाचण्यांमध्ये ते मोफत असू शकते. परंतु खासगी प्रयोगशाळांमध्ये नातेवाईकांना पैसे द्यावे लागतात.
हाडे-दातांमधून डीएनए काढणे हे मोठे आव्हान
“अनेक नमुने इतके जळलेले असतात की डीएनए काढण्यासाठी फक्त अस्थिमज्जा किंवा दातांचा लगदा वापरता येतो. हे नमुने विशेष मशीनच्या मदतीने प्रक्रिया केले जातात. त्यांचे डीएनए प्रोफाईल तयार केले जाते आणि नंतर ते नातेवाईकांनी दिलेल्या नमुन्यांशी जुळवले जाते.”
- एच. पी. संघवी, डीएफएसचे संचालक
यापूर्वीच्या मोठ्या डीएनए तपासणी
अहमदाबाद विमान अपघातानंतर कोणता मृतदेह कोणाचा आहे, हे ठरविण्यासाठी डीएनए चाचणी हा एकमेव विश्वासार्ह मार्ग ठरला. भारतात आतापर्यंत डीएनए मॅचिंगचे इतके मोठे मिशन कधीच राबविले गेले नव्हते. गेल्यावर्षी राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत जीव गमावलेल्या 27 जणांची ओळख डीएनए चाचणीतून पटविण्यात आली होती. 2023 मध्ये ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 30 जणांच्या डीएनए ओळखीसाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली होती. पण यावेळी अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ही संख्या खूप जास्त म्हणजे जवळपास पावणेतीनशे इतकी होती.
डीएनए मॅचिंग मेगा मिशन...
अपघातस्थळावरून मृतदेह आणि अवशेष गोळा करण्यात आले.
मृतांचे सांगाडे काळजीपूर्वक सीलबंद आणि पॅक करण्यात आले.
अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून हाडांमधून डीएनए काढले.
मृतांच्या नातेवाईकांना रक्ताचे नमुने देण्यासाठी बोलावण्यात आले.
डीएनए प्रोफाइलिंगसाठी रक्त नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले.
खराब जळालेली हाडे स्वच्छ करून अस्थिमज्जेतून डीएनए काढले.
आरटी-पीसीआर आणि सिक्वेन्सिंगसारख्या प्रक्रियाही पार पाडल्या.
तज्ञ डॉक्टर पीडितांचे व नातेवाईकांचे डीएनए ओळखण्यात गुंतले.
ओळख पटल्यानंतर मृतांचे अवशेष त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविले.
- संकलन : जयनारायण गवस