प्रियेसीचा खून करुन इचलकरंजीतून पसार झालेला प्रियकर सांगलीत जेरबंद
संशयीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार; सांगली विश्रामबाग पोलिसाची कामगिरी
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहापूर ( ता. हातकणंगले ) येथील लक्ष्मीनगरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराने त्यांची प्रियेशी सुरेखा राजू सोलनकर ( रा. चिपरी, ता. शिरोळ) हिचा गळा दाबून खून करुन, पलायन केले होते. या गुन्हेगाराला सांगली शहरातील विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. पोप्या उर्फ सचिन गौतम माने ( रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. खूनाची घटना गेल्या आठवड्यात घडली होती.
गुन्हेगार पोप्या उर्फ सचिन माने आणि मयत सुरेखा सोलनकर या महिलेबरोबर सुमारे पाच वर्षापासून नाजूक संबंध निर्माण झाले. त्यातून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यापूर्वी हे दोघे इचलकरंजी लगतच्या शहापूर ( ता. हातकणंगले ) येथील लक्ष्मीनगरातील ओमकार लोहार यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होते. याच दरम्यान या दोघामध्ये सतत भांडण होत होते. या भांडणामध्ये गुन्हेगार पोप्या उर्फ सचिन माने हा प्रियेशी सुरेखा सोलनकर हिला मारहाण करीत होता. ३० डिसेबरच्या रात्री या दोघामध्ये भांडण झाले. या भांडणात त्याने सुरेखा सोलनकरचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करुन, राहत्या घराला टाळाला लावून पळून गेला होता. ही बाब घर मालकाच्या निदर्शनास आला. त्यांने यांची माहिती शहापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेवून, बेशुद्ध सुरेखा सोलनकरला उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.
याबाबत शहापूर पोलीसात गुन्हेगार पोप्या उर्फ सचिन माने यांच्या विरोधी खूनाचा गुन्हा झाला. घटना घडल्यापासून तो पसार झाल्याने त्याच्या शोधासाठी शहापूर पोलीसाची वेगवेगळी पथके शोध घेत होती. पण तो मिळून येत नव्हता. याच दरम्यान तो सांगली विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि त्याच्या पथकाला तो मंगळवारी मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांने विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची दागिने चोरी केल्याची कबूली दिली आहे, अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.