‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ फायनल प्रथमच रंगणार लॉर्ड्सवर
वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तारखा व स्थळ जाहीर झाले असून लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स स्टेडियमवर पुढील वर्षी 11 जूनपासून ही लढत रंगेल. ‘आयसीसी’च्या निवेदनाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, लॉर्ड्सवर ही अंतिम लढत 11 ते 15 जून या कालावधीत खेळविली जाईल. आवश्यकता भासल्यास 16 जून हा राखीव दिवस म्हणून उपलब्ध असेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी लॉर्ड्सचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. साउथहॅम्प्टन हे पहिल्या स्पर्धेतील (2021) अंतिम लढतीचे ठिकाण, तर ओव्हल हे दुसऱ्या स्पर्धेच्या (2023) अंतिम सामन्याचे ठिकाण राहून अनुक्रमे न्यूझीलंडने आणि अनुक्रमे ऑस्ट्रेलियाने त्यावेळी जेतेपद मिळविले होते.
सध्याचे या स्पर्धेचे चक्र पूर्ण झाल्यावर क्रमवारीतील अव्वल दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. रोहित शर्माचा भारत सध्या विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या पुढे अग्रस्थानावर आहे. भारतीय संघाचा आतापर्यंत झालेल्या डब्ल्यूटीसीच्या दोन्ही फायनलमध्ये सहभाग राहिलेला आहे, परंतु त्यांना अद्याप विजेतेपद मिळविता आलेले नाही.
संघांना मुसंडी मारण्याच्या दृष्टीने अजून बरेच गुण कमावण्याची संधी असून न्यूझीलंड (तिसरा क्रमांक), इंग्लंड (चौथा), श्रीलंका (पाचवा), दक्षिण आफ्रिका (सहावा) आणि बांगलादेश (सातवा) हे संघ अजूनही अंतिम लढतीच्या शर्यतीत आहेत. चाहत्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिकिटांसाठी नोंदणी करण्याची संधी मिळेल आणि आयसीसीचे सीईओ जेफ अॅलार्डिस यांना यावेळी मागणी जास्त राहण्याची अपेक्षा आहे.