‘डब्ल्यूटीसी’मध्ये 4 दिवसांच्या कसोटीस ‘आयसीसी’ तयार
लहान देशांना लागू होईल बदल : भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड खेळतील पाच दिवसांचेच सामने
वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 2027 ते 29 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मंजुरी देण्यास तयार आहे. परंतु भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अजूनही पारंपरिक पद्धतीने पाच दिवसांचे सामने खेळू शकतील, असे येथे प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे.
एका दिवसाने सामन्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय हा एक महत्त्वाचा बदल असेल आणि लहान देशांना अधिक कसोटी आणि दीर्घ मालिका खेळण्यास मदत करू शकेल. ‘गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी 2027 ते 29 मधील स्पर्धेसाठी वेळेत मंजुरी देण्याच्या उद्देशाने चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा दर्शविला असल्याचे समजते, असे द गार्डियन या वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अॅशेस, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि नव्याने नाव देण्यात आलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी पाच दिवसांच्या सामन्यांच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक तयार करण्यास परवानगी असेल, असेही त्यात म्हटले आहे. अँडरसन-तेंडुलकर चषकासाठीची पहिली मालिका शुक्रवारी हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीने सुरू होईल.
आयसीसीने 2017 मध्ये पहिल्यांदा द्विपक्षीय सामन्यांच्या बाबतीत चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता दिली. 2019 आणि 2023 मध्ये खेळलेल्या आयर्लंडविऊद्ध चार दिवसांच्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड गेल्या महिन्यात ट्रेंट ब्रिज येथे चार दिवसांचा सामना झिम्बाब्वेविऊद्ध खेळले. सदर वृत्तानुसार, लागणारा वेळ आणि खर्चामुळे अनेक लहान देश कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास नाखूष आहेत. परंतु चार दिवसांवर सामने आणण्याचा बदल केल्यास तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत संपूर्ण तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळविता येईल.
चार दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याचे तास वाढवून दिवसाला 90 षटकांऐवजी किमान 98 षटके खेळण्याची तरतूद केली जाते. यामुळे वाया जाणारा वेळ भरून काढला जातो, याकडे सदर वृत्तात लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात विश्वविजेतेपद पटकावल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या कठीण प्रवास कार्यक्रमामुळे हा मुद्दा आणखी अधोरेखित झाला आहे आणि बदलाच्या गरजेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असेही त्यात म्हटले आहे.
तथापि, 2025-27 ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पाच दिवसांच्या सामन्यांच्या विद्यमान पद्धतीने सुरू राहील. त्याची सुरुवात मंगळवारी श्रीलंकेतील बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने झाली आहे. 2025 ते 27 स्पर्धेत नऊ देशांमध्ये 27 कसोटी मालिका होणार असून त्यापैकी 17 फक्त दोन सामन्यांच्या मालिका असतील, तर तीन सामन्यांच्या सहा मालिका असतील. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे मात्र एकमेकांविऊद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतील.