आयसीसीची बैठक 26 नोव्हेंबरला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान पाकमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणे निश्चित करण्यासाठी आयसीसीची तातडीची बैठक पुढील आठवड्यात बोलाविण्यात येणार असल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. सदर बैठक मंगळवारी दि. 26 नोव्हेंबरला आयोजित केली आहे.
या बैठकीमध्ये पाकमधील ही स्पर्धा केवळ पाकिस्तानमध्येच खेळविण्याबाबत किंवा हायब्रीड मॉडेलचा वापर करण्याबाबत चर्चा होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाक भूषवित आहे. आता या स्पर्धेच्या यजमानपदासाठी आणखी एका देशाला संधी देण्याबाबत चर्चा केली जाईल. या स्पर्धेत भारतीय संघ पाकमध्ये खेळणार नसल्याने पीसीबीने या संदर्भात लेखी मागणी केली होती. पाकने यापूर्वी आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार आयोजित केली होती आणि या स्पर्धेतील भारताचे पाकबरोबरचे सामने श्रीलंकेत खेळविले गेले होते.