For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसीसीचे इलाईट पंच पॅनेल जाहीर

06:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयसीसीचे इलाईट पंच पॅनेल जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था /दुबई

Advertisement

आयसीसीने आपल्या इलाईट पंच पॅनेलची घोषणा गुरुवारी केली असून त्यामध्ये बांगलादेशच्या शरफुद्दौला इबने शाहिद यांचा समावेश करण्यात आला आहे. तर भारताच्या नितीन मेनन यांना पाचव्यांदा टॉप टियरमध्ये स्थान मिळाले आहे. आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमध्ये समावेश करण्यात आलेले शाहिद हे बांगलादेशचे पहिले पंच आहेत. इंदोरचे नितीन मेनन यांचा 2020 च्या कोरोना महामारी कालावधीत आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. 12 सदस्यांच्या या इलाईट पंच पॅनेल यादीमध्ये नितीन मेनन हे एकमेव भारतीय पंच आहेत. 40 वर्षीय नितीन मेनन हे आयसीसीच्या इलाईट पॅनेलमध्ये कार्यरत राहणारे भारताचे तिसरे पंच असून यापूर्वी एस. रवी आणि भारताचे माजी कसोटीवीर एस. वेंकटराघवन यांचा या पॅनेलमध्ये समावेश होता. वेंकटराघवन यांनी 73 कसोटीत तर एस. रवीने 33 कसोटीत पंचगिरी केली आहे. नितीन मेनन यांनी आतापर्यंत 23 कसोटी, 58 वनडे आणि 41 टी-20 अशा एकूण 122 सामन्यात आयसीसीचे पंच म्हणून चोख कामगिरी बजावली आहे.

अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने येत्या जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नितीन मेनन यांची निश्चितच आयसीसीचे पंच म्हणून नियुक्ती राहिल आणि ते एस. वेंकटराघवन यांचा एकूण 125 सामन्यांचा विक्रम मागे टाकतील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेत पंचगिरी करण्याचे नितीन मेनन यांचे स्वप्न गेल्या वर्षी साकार झाले. आयसीसीच्या पंच पॅनेलमधून बांगलादेशच्या शरफुद्दौला यांना वगळण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी अलिकडेच निवृत्त झालेल्या इरासमुस यांचा समावेश करण्यात आला होता. 2006 पासून शरफुद्दौला यांचा आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलमध्ये समावेश होता. पण 2010 च्या जानेवारी महिन्यात मिरपूर येथे झालेल्या बांगलादेश आणि लंका यांच्यातील वनडे सामन्यात त्यांनी पहिल्यांदा पंचगिरी केली होती. शरफुद्दौला यांनी 10 कसोटी, 63 वनडे आणि 44 टी-20 सामन्यात पंच म्हणून कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी महिलांच्या 13 वनडे आणि 28 टी-20 सामन्यात पंचगिरी केली आहे. आयसीसीच्या इलाईट पॅनेलमध्ये आपला समावेश केल्याबद्दल शरफुद्दौला यांनी आयसीसीचे आभार मानले आहेत.

Advertisement

ख्रिस ब्रॉडला वगळले

आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमधील ख्रिस ब्रॉड यांना वगळण्यात आले आहे. आता या आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमधील पंचांची संख्या 7 ऐवजी 6 करण्यात आली असल्याने त्यामध्ये ख्रिस ब्रॉड यांचा समावेश झालेला नाही. 2003 पासून ब्रॉड हे आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलचे सदस्य होते. त्यांनी आपल्या पंचगिरीच्या कारकिर्दीत 123 कसोटी, 361 वनडे आणि 135 टी-20 सामने त्याचप्रमाणे महिलांच्या विभागातील 15 टी-20 सामन्यात चोख पंचगिरी केली आहे. अमिरातच्या आयसीसी इलाईट पॅनेलच्या सामनाधिकारी विभागात आयसीसीचे प्रमुख कार्यकारी जेफ अॅलरडाईस यांनी ख्रिस ब्रॉड यांच्या कामगिरीचे कौतुक केले असून ते या पॅनेलचे महत्त्वाचे सदस्य असल्याचे सांगितले. अमिरात आयसीसी इलाईट सामनाधिकारी पॅनेलमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बुन, न्यूझीलंडचे जेफ क्रो, लंकेचे रंजन मदुगले, झिंबाब्वेचे अॅड्य्रू पायक्रॉफ्ट, विंडीजचे रिची रिचर्डसन आणि भारताचे जवागल श्रीनाथ यांचा समावेश आहे.

अमिरात आयसीसी इलाईट पंच पॅनेल -

कुमार धर्मसेना (लंका), ख्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), मायकेल गॉ (इंग्लंड), अँड्रीयन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड), नितीन मेनन (भारत), एहसान रझा (पाक), पॉल रायफल (ऑस्ट्रेलिया), शरफुद्दौला इबनी शाहिद (बांगलादेश), रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (विंडीज).

Advertisement
Tags :

.