‘आयसीसी’कडून ‘चॅम्पियन्स ट्रॉफी टीम’ जाहीर, 6 भारतीयांचा समावेश
वृत्तसंस्था/ दुबई
‘आयसीसी’ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ घोषित केला असून त्यात भारताच्या पाच खेळाडूंना स्थान मिळाले आहे. स्पर्धेच्या या नवव्या आवृत्तीत भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले. फलंदाजी व गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत रंगत आणली. त्यापैकी खालील खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे.
रचिन रवींद्र (न्यूझीलंड-251 धावा, 62.75 सरासरी, दोन शतके)
किवी स्टार. रवींद्रने न्यूझीलंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन सामन्यांमध्ये मोठी कामगिरी केली आणि फिरकी गोलंदाज म्हणून योगदान दिले. अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
इब्राहिम झद्रान (अफगाणिस्तान-216 धावा, 72 सरासरी, एक शतक)
या सलामीवीराने अफगाणिस्तानसाठी तो किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध केले. इंग्लंडवरील प्रसिद्ध विजयात त्याने 177 धावा करून मोलाचा वाटा उचलला. ही स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
विराट कोहली (भारत-218 धावा, 54.5 सरासरी, एक शतक)
किंग कोहलीने अजूनही आपण शिखरावर असल्याचे सिद्ध करताना ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या सेमीफायनलमधील 84 धावांसह दोन प्रभावी खेळी केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांतील 14 हजार धावांचा टप्पा देखील ओलांडला.
श्रेयस अय्यर (भारत-243 धावा, 48.6 सरासरी, दोन अर्धशतके)
भारताच्या मधल्या फळीतील एक भक्कम फलंदाज असलेल्या श्रेयसचे मागील चार सामन्यांतील सर्वांत कमी योगदान हे 45 धावांचे राहिले. दुबईतील फलंदाजीचा कस पाहणाऱ्या परिस्थितीत तो सातत्याने आधारस्तंभ राहिला.
के. एल. राहुल (यष्टीरक्षक, भारत-140 धावा, 140 सरासरी, सर्वोच्च 42 धावा)
यष्टीरक्षक तसेच फलंदाजीत फिनिशर म्हणून त्याने चोख भूमिका बजावली. बाद फेरीतील भारताच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविऊद्ध त्याने अनुक्रमे नाबाद 42 आणि नाबाद 34 धावा काढल्या.
ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड-177 धावा, 59 सरासरी, दोन बळी, पाच झेल)
या अष्टपैलू खेळाडूने तो जगातील सर्वांत धोकादायक फलंदाजांपैकी एक का आहे याची झलक दाखवलीच. शिवाय आपले अप्रतिम क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवले. यात विराट कोहलीसह तीन नेत्रदीपक झेलांचा समावेश राहिला.
अझमतुल्लाह उमरझाई (अफगाणिस्तान-126 धावा, 42 सरासरी, सात बळी)
ओमरझाईची मधल्या फळीतील फलंदाजी तसेच त्याची गोलंदाजी देखील प्रभावी राहिला. इंग्लंडविऊद्धची 58 धावांत 5 बळी ही त्याची कामगिरी विजय मिळवून देणारी ठरली.
मिशेल सँटनर (कर्णधार, न्यूझीलंड-नऊ बळी, 26.6 सरासरी, 4.80 इकोनॉमी रेट)
न्यूझीलंडच्या प्रभावी मोहिमेत सँटनरचे नेतृत्व आणि गोलंदाजी जागतिक दर्जाची राहिली.
मोहम्मद शमी (भारत-9 बळी, 25.8 सरासरी, 5.68 इकोनॉमी रेट)
विश्वासार्ह व सातत्यपूर्ण राहिलेल्या शमीने थाटात पुनरागमन करताना बांगलादेशविऊद्धच्या 53 धावांत 5 बळींसह उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यातही योगदान दिले. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने 4 बळी मिळविले.
मॅट हेन्री (न्यूझीलंड-10 बळी, 16.7 सरासरी, 5.32 इकोनॉमी रेट)
स्पर्धेत सर्वांत जास्त बळी मिळविलेल्या या गोलंदाजाला दुखापतीमुळे अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली नाही. हेन्री संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये राहून त्याने प्रत्येक सामन्यात बळी मिळविले. भारताविऊद्धच्या गटस्तरीय सामन्यात त्याने 42 धावा देऊन 5 बळी मिळविले.
वरुण चक्रवर्ती (भारत-9 बळी, 15.1 सरासरी, 4.53 इकोनॉमी रेट)
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळलेला असूनही निवड समितीने टाकलेला विश्वास या 33 वर्षीय खेळाडूने सार्थ ठरवला आणि तीन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नऊ बळी घेतले.
12 वा खेळाडू : अक्षर पटेल (भारत-5 बळी, 39.2 सरासरी, 4.35 इकोनॉमी रेट)
उपयुक्त खेळाडू राहिलेल्या अक्षरने गोलंदाजीत चांगले योगदान देताना पाच बळी घेतले आणि फलंदाजीतही एकूण 109 धावा केल्या. यामध्ये अंतिम सामन्यातील 29 धावांचा समावेश राहिला. शिवाय त्याने दोन उत्तम झेल घेतले.