कंग्राळी बुद्रुक गावातून आयएएस, आयपीएस अधिकारी तयार व्हावेत!
कंग्राळी बुद्रुक येथील 40 लाख रुपये खर्चून बांधलेल्या डिजिटल ग्रंथालयाचे उद्घाटन
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गाव सुतार कामगार, गवंडी कामगार फरशी फिटिंग कामगारांच गाव अशी ओळख आहे. परंतु आपल्याच गावातील तुमच्यासाठी सुरू केलेल्या डिजिटल ग्रंथालयाचा पुरेपूर सदुपयोग करून घेऊन या गावातून आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होऊन गावचे नाव आजरामर करण्याचे विचार महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कंग्राळी बुद्रुक येथील कन्नड सरकारी शाळा आवारात शासकीय निधीतून 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल ग्रंथालयाचे सोमवारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष रोहिणी नाथबुवा होत्या. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते डिजिटल ग्रंथालय नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते डिजिटल ग्रंथालय इमारतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते काम्प्युटर विभागाचे उद्घाटन करण्यात आले तर नूतन काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते व्हिडिओ क्लिपचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, उपाध्यक्षा दीपा पम्मार व इतर महिला सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकमध्ये पीडीओ गोविंद रंगापगोळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी डिजिटल ग्रंथालयाचा पुरेपूर सदुपयोग करून घेऊन शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्राम पंचायतीच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रंथालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, जगतगुरु बसवेश्वर, सावित्रीबाई फुले जोतिबा फुले, वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंदसह देशातील अनेक महनीयांची प्रेरणा व स्फूर्ती देणारी तैलचित्रे लावण्यात आली होती. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य, सदस्या, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन करून ग्रा. पं. कर्मचारी मलप्रभा कणबर्गी यांनी आभार मानले.
कंग्राळी बुद्रुक गावासाठी 10 कोटी अनुदान मंजूर
कंग्राळी बुद्रुक गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा जवळजवळ 43 वर्षांनी 28 एप्रिल 2026 रोजी साजरी होणार असल्यामुळे रस्ते, गटारी, पाणी तसेच इतर सर्वांगीण विकासासाठी शासकीय निधीतून 10 कोटी रुपये मंजूर केल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. तसेच गणपती मंदिरासाठी 30 लाख रुपये श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरसाठी 40 लाख रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.