आयएएफचे ‘मिग-29’ आग्रा येथे कोसळले
लढाऊ विमान आगीत भस्मसात : पॅराशूटद्वारे बाहेर पडल्याने दोन्ही पायलट बचावले
वृत्तसंस्था/ आग्रा
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात सोमवारी हवाई दलाचे मिग-29 विमान शेतात कोसळले. सरावादरम्यान आग्रा जिह्यातील कागरौल भागातील बाघा सोनगा गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील एका शेतात विमान पडताच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अपघाताच्या वेळी विमानात दोन पायलट होते. आग लागण्याच्या काही सेकंद आधी दोन्ही पायलट पॅराशूटद्वारे बाहेर पडल्याने बचावले. दोन्ही पायलट अपघात स्थळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर सुरक्षितपणे उतरले.
विमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर हवाई दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ग्वाल्हेरमध्ये हवाई दलाचा सराव सुरू असताना तेथून विमानाने उ•ाण घेतल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर एअरबेसवरून उ•ाण घेतल्यानंतर हवाई दलाचे मिग-29 विमान कागरौल भागात कोसळले. ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजता घडली. कागरौलच्या बाघा सोनगा गावातील लोकांनी सोमवारी संध्याकाळी हवाई दलाचे विमान शेतात पडताना पाहिले.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक परिसरात गोळा झाले होते. पायलट आणि सहवैमानिकाने उडी मारून जीव वाचवला. अपघातानंतर पायलट आणि त्याचा साथीदार तीन किलोमीटर अंतरावर सापडल्याचे सांगण्यात येत आहे. लोकवस्तीच्या परिसरात विमान कोसळले असते तर मोठे नुकसान झाले असते. या घटनेबाबत हवाई दलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.