शिक्षण घेईन तर याच महाविद्यालयात
प्रवेशासाठी 16 वर्षांपासून परीक्षा देतोय इसम
चीनमधील प्रख्यात त्सिंगहुआ युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळविण्याच्या प्रयत्नात सलग 16 वर्षांपासून परीक्षा देत असलेल्या एका जिद्दी व्यक्तीला चीनचा सर्वात जिद्दी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तांग शांगजुनने 2009 मध्ये पहिल्यांदा चीनच्या अत्यंत कठिण कॉलेज प्रवेश परीक्षा गाओकाओमध्ये भाग घेतला होता. त्याला 750 पैकी 372 गुण मिळाले होते, त्याची इच्छा असलेल्या सिंघुआ युनिव्हर्सिटीत या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळू शकला नव्हता. परंतु तो अन्य कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्यास तयार नव्हता, यामुळे त्याने पुन्हा प्रवेश परीक्षा दिली.
2016 पर्यंत त्याचे गुण सन्मानजक 625 अंकांपर्यंत सुधारले, जे त्याच्या गुआंक्सी प्रांतातील अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पुरेसे होते, परंतु तो स्वत:च्या पहिल्या पसंतीवर ठाम राहिला, याचमुळे त्याने सर्व अन्य विद्यापीठांकडे दुर्लक्ष करत वर्षानुवर्षे प्रयत्न सुरू ठेवले. परंतु सिंघुआ विद्यापीठात प्रवेश मिळविता येईल इतपत गुण त्याला कधीच प्राप्त करता आलेले नाही.
2019 मध्ये तांगने 750 पैकी 649 गुण मिळविले, यामुळे त्याला सिंघुआमध्ये प्रवेश मिळू शकला असता, परंतु त्याची इच्छा असलेल्या दोन प्रमुख विषयांमध्ये त्याला प्रवेश मिळू शकला नाही. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय त्याने निवडले होते, बहुतांश उमेदवारांनी मिळालेल्या विषयांवर तडजोड केली, परंतु तांगने अद्याप हार मानलेली नाही.
पुढील काळात त्याचे गुण कमी होत गेले, वाढत्या वयामुळे आता त्याची स्मरणशक्ती कमकुवत होत असल्याने खराब निकाल लागत असल्याचे लोक म्हणू लागले. देशाच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळविणे म्हणजे मोठे यश असल्याचे त्याला वाटते, परंतु जीवनात यशस्वी होण्याचे आणखी अनेक मार्ग आहेत. स्वत:च्या क्षमतेपेक्षा अधिक मोठे लक्ष्य बाळगून अट्टाहास कायम ठेवल्यास कधी कधी अत्यंत मोठे अपयश हाती लागते असे चीनमधील शिक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाने तांगप्रकरणी म्हटले आहे.
मागील 16 वर्षांमध्ये तांग शानजुनने स्वत:ला आणि वृद्ध आईवडिलांना सहाय्य करण्यासाठी अजब नोकऱ्या केल्या आहेत. विद्यापीठात प्रवेशाचा हट्ट सोडून देत नोकरी शोधावी हे त्याला आता उमगले आहे. परंतु तो पुढील वर्षी पुन्हा प्रवेश परीक्षा देणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.