बेटिंगचे प्रकार खपवून घेणार नाही!
गृहमंत्री जी. परमेश्वर यांचा इशारा
बेळगाव : ऑनलाईन बेटिंग व सायबर गुन्हेगारी थोपवण्यासाठी कर्नाटकात 43 स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. कोणत्याही परिस्थितीत बेटिंगचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधानसभेत दिला. सकलेशपूरचे आमदार सिमेंट मंजू यांनी क्रिकेट व कबड्डीवरील बेटिंगमुळे बरबाद होत असलेल्या युवापिढीविषयी तारांकित प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी, राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सायबर गुन्हेगारी घटली आहे. देशात प्रथमच कर्नाटकात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या आहेत. ऑनलाईन गेमिंग रोखण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या मुद्द्यावर इंडिया गेमिंग फेडरेशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 19 डिसेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ही समस्या केवळ कर्नाटकाची नाही. तर संपूर्ण देशाची समस्या आहे. गेल्या चार वर्षांत 52 हजार सायबर गुन्हे घडले आहेत. गुन्हे थोपवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. ही चर्चा सुरू असतानाच राज्यात कबड्डी व क्रिकेटबरोबरच मुख्यमंत्री कोण होणार? यावरही बेटिंग सुरू झाले. याकडे भाजपचे सुनीलकुमार यांनी लक्ष वेधले.