मी सुडाचे राजकारण करणार नाही!
नंदगड येथे सत्क्रारप्रसंगी अरविंद पाटील यांचा ठाम निर्धार : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील
वार्ताहर/नंदगड
माझ्या राजकीय कालावधीत मी कधीही सुडाचे राजकारण केलेले नाही. आणि यापुढेही करणार नाही, जर कोणी आडवे आल्यास त्यांना सोडणार नाही, असा ठाम निर्धार आपण केले असल्याचे वक्तव्य माजी आमदार अरविंद पाटील यांनी नंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले, आपण मोठे होण्यासाठी अनेकांचे आशीर्वादही घेतले. त्यांचे मार्गदर्शन घेतले. तर आपणही अनेकांना मोठे केले. पण आपलीच माणसे आम्हाला सहकार्य करण्याऐवजी आमच्याच पाठीत खंजीर खुपसतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिली. जनतेने दिलेले सहकार्य मी कधीही विसरत नाही. नंदगड येथील दक्षिण विविधोद्देश ग्रामीण सहकारी संघाच्यावतीने आमदार अरविंद पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पाचव्यांदा बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण विविधोद्देश ग्रामीण संघाचे अध्यक्ष पी. एच. पाटील होते.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष पुंडलिक कारलगेकर, संचालक दिलीप पाटील, पार्वती पाटील, रेणुका हलशीकर, संभाजी पारिश्वाडकर, महादेव पाटील, राहुल पाटील, कृष्णा वड्डर, अर्जुन खानगावी, चंद्रकांत घाडी, व्यंकट केसरकर आदी उपस्थित होते. अरविंद पाटील म्हणाले, वीस वर्षांपूर्वी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे केवळ 9 कोटी 20 लाख रुपये अॅडव्हान्स होते. माझ्या वीस वर्षाच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना संघात सभासदत्व दिले. 200 कोटीपर्यंत अॅडव्हान्स वाढवला. त्यामुळे जवळपास 50 हजार शेतकऱ्यांना विना व्याज पैसे वापरायला मिळत आहेत. बांधापर्यंत नदी, नाल्याचे व बंधाऱ्याचे पाणी पोहोचावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. यावेळी गुंडू हलशीकर, प्रदीप पवार, विठ्ठल पाटील, राजू पाटील, पी. एच. पाटील यांची अरविंद पाटलांच्या विजयाची अभिनंदन करणारी भाषणे झाली. संघाच्यावतीने अरविंद पाटील यांचा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाल्याबद्दल तसेच या संघाच्या संचालिका पार्वती विठ्ठल पाटील यांचा मार्केटिंग सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वागत सेक्रेटरी मुकुंद पाटील यांनी तर आभार श्रीनाथ पाटील यांनी मानले.