‘बदनामीच्या षड्यंत्राचा मला फरक पडणार नाही’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : लँड माफियांची दलाली बंद झाल्याने बदनामी
पणजी : भाजपच्या डबल इंजिन सरकारवर गोमंतकीयांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कितीही व्हिडीओ काढून व्हायरल केले तरी काहीच फरक पडणार नाही. या कृत्यामागे बोलविता धनी कोण आहे ते सर्वांना ठाऊक आहे. जमीन विक्री व्यवहारातून मिळणारी दलाली बंद झाल्यामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्यांकडून ही बदनामी चालली आहे, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. सदर व्हिडीओला उत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा व्हिडीओ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांचा वापर करून माझ्या बदनामीचा प्रयत्न चालविला आहे. राजकीयदृष्ट्या प्रेरित झालेल्यांचे हे षड्यंत्र असून राज्याचा सुरळीत चाललेला कारभार विस्कळीत करण्याचा डाव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात सरकारने केलेल्या कठोर कारवाईमुळे अनेकांची दलाली बंद झाली आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ व्हायरल करून माझी बदनामी चलविली आहे. यामागे राजकीय हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र भाजपच्या डबल इंजिन सरकारवर गोमंतकीयांचा पूर्ण विश्वास आहे. गोमंतकीयांनी या व्हिडियोस बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
99 जमिनी ताब्यात
गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यात जमिनी बळकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालत होते. अन्य राज्ये किंवा देशांमध्ये स्थायिक झालेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळकावण्यात येत होत्या. मात्र या प्रकारांची आपण गांभीर्याने दखल घेतली आणि एसआयटी स्थापन करून प्रथमच कारवाई झाली. त्याअंतर्गत आतापर्यंत सरकारने 99 जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.
आतापर्यंत 58 जणांना अटक
या प्रकरणात एसआयटीने कडक कारवाई करत 58 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दलाल वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते माझी बदनामी करतात म्हणून कारवाई थांबणार नाही, चालूच राहणार आहे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सहा कर्मचारी निलंबित
या प्रकरणात सरकार एवढ्यावरच थांबले नसून सहा सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशाप्रकारे सरकारने कारवाई केल्याने बऱ्याच दलालांना मोठा दणका बसला आहे. त्यांचे कमिशन बंद झाले आहे. या प्रकरणात भविष्यात आणखीही अनेकांवर कारवाई होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्याची आर्थिक स्थितीही सुदृढ
विद्यमान सरकार राज्यात योग्यरित्या काम करत आहे. सुयोग्य व्यवस्थापनामुळे राज्याची आर्थिक स्थितीही सुदृढ आहे. म्हणूनच राज्याने मर्यादेपेक्षाही कमी कर्ज घेतले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
झुआरी जमिनीबाबत लवकरच पर्दाफाश
झुआरी प्रकल्पास औद्योगिक वापरासाठी जमीन देण्यात आली त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे या जमीन प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मात्र याच जमिनीच्या वापरासंबंधीच्या प्रक्रियेत बदल करून नियमितपणे कोण कमिशन घेत होते आणि घेत आहेत त्याचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.