पंतप्रधान मोदी यांचा स्वयंपाक करीन !
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी स्वयंपाक करण्यासही तयार आहे. मात्र, ते मी शिजवलेले अन्न स्वीकारतील की नाही, हे माहिती नाही,’ असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे. या उद्गारांवर विविध राजकीय पक्षांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांचे हे विधान राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. तर या उद्गारांमधून भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील जवळचे संबंध स्पष्ट होतात, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. अन्य पक्षांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
खोचक उद्गार ?
नवरात्रीचा उत्सव सुरु असताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मासे खाल्ले आणि या खाण्याचा व्हिडीओही प्रसिद्ध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. नेहमी मांसाहार करणारे हिंदूही नवरात्री उत्सवात किंवा अन्य सणांमध्ये मांसाहार करीत नाहीत. पण यादव यांनी धर्माची खिल्ली उडविण्यासाठीच हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत केला होता. या घटनेचा संदर्भ देत, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी स्वयंपाक करण्याची भाषा केली होती, अशी सारवासारवी वाद निर्माण झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने केली.
भाजपचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत: केलेले मासे आणि भात खाऊ घालण्याची ममता बॅनर्जी यांची इच्छा असावी. ही इच्छा चांगली आहे. मात्र, त्या आधी त्यांनी त्यांचे नजीकचे सहकारी आणि विश्वासू फिरहद हकीम यांना डुकराच्या मांसाचे पदार्थ खाऊ घालावेत. त्यांनी ते स्वीकारले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार करता येईल, असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे.