‘माझं ऐकून न घेता केलेल्या कारवाईचे दु:ख सलत राहील’
आमदार गोविंद गावडे यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
वार्ताहर/ माशेल
गोव्याच्या क्रांतिदिनी माझ्याच भाजपा सरकारने मला दिलेली अमूल्य भेट मी स्वीकारली आहे. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठींशी माझी भेट घालून देणे टाळले. पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी माझी कोणतीच बाजू ऐकून न घेता तडकाफडकी मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेतला. सरतेशेवटी शिस्तभंगाची कारवाई असे नाव देत स्वत: मुख्यमंत्र्यांनी कारवाई केल्याचे सांगितल्याचे दु:ख सलत राहील. भाजपात राहून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे 2047 मधील स्वप्नातला गोवा साकारण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन करीत आमदारकीच्या राजीनाम्याच्या अफवेलाही आमदार गोविंद गावडे यांनी पूर्णविराम दिला.
प्रियोळ प्रगती मंचच्या बॅनरखाली खांडोळा येथील बीग बी सभागृहात काल रविवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत आमदार गोविंद गावडे बोलत होते. डॉ. सावंत यांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर आपल्या लाडक्या प्रियोळ व समस्त आदिवसी समाजबांधवांना स्पष्टीकरण देताना ते बोलत होते.
राजीनामा देण्यासाठी भाजपात प्रवेश घेतलेला नाही
भाजपात आपण राजीनामा देण्यासाठी प्रवेश घेतलेला नाही. आपला विकास व कार्यशैली विरोधकांना खुपत असल्यामुळेच पक्षातून राजीनामा देण्याच्या वावड्या ते उठवत आहेत. मी आमदारकीचा राजीनामा देणार नसून मला निवडून दिलेल्या प्रियोळच्या जनतेलाच आपला राजीनामा मागण्याचा अधिकार असल्याचा टोमणा विरोधकांना मारत त्यांनी समस्त जनसमुदायाला दंडवत घालून सभा आटोपती घेतली. राज्यभरातून विविध तालुक्यातून आमदार गावडे यांचे समर्थक व हितचिंतक मोठया संख्येने हजर होते
आपणच सूचविले होते सावंतांचे नाव
सन 2019 साली आपण स्वत: सुदिन ढवळीकर यांना विरोध करून सभापती असलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव सूचविले होते. यावेळी जीसीक्स गटही कार्यरत होता. शिरोड्यातील पोटनिवडणुकीत आमदार सुभाष शिरोडकर यांच्या विजयातही मनापासून काम केले. होते दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यामुळे भाजपाला आपण होकार दिला.
सावंतांचे हात बळकटीसाठीच भाजपात
पुढे सन 2022 साली मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत असताना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पक्षश्रेष्ठींची भेट कधी दिली नाही. डॉ. सावंत यांच्याबरोबर आपण एका प्रामाणिक मित्राची भूमिका अतिशय चोखपणे बजावली.
जे. पी. नड्डा यांच्याशी भेट नाकाली
प्रथम भाजपाच्या केंद्रीय पक्षाध्यक्षाच्या सांगण्यावरून मंत्रीपदावरून काढण्यात आल्याचे सांगितले. यावेळी मला भाजपा अध्यक्ष जगन प्रकाश नड्डा यांना भेटण्याची विनंती नाकारण्यात आलेली आहे. त्dयानंतर मीच स्वत: मंत्रिमंडळातून हटविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगणे हे पचविण्यापलीकडे होते. निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता कमी दिसून आली. प्रदेशाध्यक्षांनी पदाची गरिमा बाळगावी, असेही ते म्हणाले.