पाच वर्षांसाठी मीच सीएम!
मुख्यमंत्रिपदाविषयी सिद्धरामय्या यांची ठाम भूमिका : नेतृत्त्व बदलाच्या मुद्द्याला पूर्णविराम
प्र्तिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस सरकारमधील नेतृत्त्वबदलाची चर्चा जोर धरत असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी मीच ‘सीएम’ असून आमचे सरकार खडकासारखे मजबूत असेल, असे सांगून नेतृत्त्व बदलाच्या मुद्द्याला पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बदलासंदर्भात कोणीही वाच्यता करू नये, अशी ताकिद दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री बदलाविषयी अनेक मंत्री-आमदारांनी उघडपणे मते मांडली आहेत. एका गटाने शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी हायकमांडकडे केली तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांच्या गटाने मुख्यमंत्री बदलू नये, अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान, बेंगळूर दौऱ्यावर आलेल्य राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पक्षातील आमदारांशी चर्चा केली असून सध्या कोणत्याही मुद्द्यावर उघडपणे वक्तव्ये करू नका, अशी ताकिद दिली आहे.
दरम्यान, बुधवारी चामराजनगर जिल्ह्यातील नंदी टेकडीवरील भोगनंदीश्वर मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, 5 वर्षे मीच मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर राहीन, आमचे सरकार खडकासारखे मजबूत आहे. भाजप आणि निजद नेते खोटे बोलत आहेत. ते आमचे हायकमांड आहेत का, असा सवाल त्यांनी पत्रकारांनी उपस्थित केला. आम्ही सर्वजण एकत्र आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मीच मुख्यमंत्रिपदावर राहीन, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
लोकशाहीत प्रत्येकाला मंत्री बनण्याचा अधिकार आहे. मंत्रिपदांबाबत पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेतील. आमच्या पक्षातून 142 जण विधानसभेवर निवडून आले आहेत. केवळ 34 जणांना मंत्रिपद देता येते. सर्वांनाच मंत्री बनविणे शक्य नाही, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
भाजप-निजदला सत्तेचे दिवास्वप्न
भाजप आणि निजद नेते सत्तेचे दिवास्वप्न पाहत आहेत, अशी खिल्लीही सिद्धरामय्या यांनी उडविली. सत्तेत असताना भाजप-निजदने काहीही केले नाही. भाजपने यापूर्वी कुमारस्वामी यांच्यासोबत युती करून काय केले, हे सर्व जनतेला ठाऊक आहे. त्यांनी केवळ खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपद रिक्त नाही : अजयसिंग
राज्यात मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार अजयसिंग यांनी दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व आमदार, मंत्री एकत्र आहेत. काही आमदारांनी आणि मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल. मतदारसंघांच्या अनुदान वाटपाच्या विषयावरही तोडगा निघेल. कल्याण कर्नाटक भागात अनेक विकासकामे होत आहेत. विशेषत: सर्व आमदारांना 50 कोटी रुपये निधी मिळणार आहे. सर्व पक्षांमध्ये मतभेद असतातच. आमचे सरकार सुस्थितीत आहे. काही आमदार वैयक्तिक मते व्यक्त करत आहेत, परंतु, यामुळे पक्षाच्या प्रतिमेला कोणताही धक्का बसलेला नाही, असेही आमदार अजयसिंग म्हणाले.
माझ्याकडे दुसरा पर्याय नाही : डी. के. शिवकुमार
सिद्धरामय्या हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदी राहण्यास माझा कोणताही आक्षेप नाही. माझ्याकडे दुसरा पर्यायही नाही. काँग्रेस हायकमांड जे सांगेल त्याचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. मी त्यांच्या पाठिशी उभा राहीन, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे.
पक्षातील काही आमदारांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी उघडपणे केली आहे. याविषयी पत्रकारांनी विचारले असता डी. के. शिवकुमार यांनी, मला यावर काहीही चर्चा करायची नाही. लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष सत्तेवर येण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. मी एकट्यानेच परिश्रम घेतलेले नाहीत. याविषयी देखील विचार केला पाहिजे, असे मार्मिकपणे म्हटले आहे. राज्य काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. राज्यात सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत. असे असताना मुख्यमंत्री बदलासंदर्भात कोणीही वाच्यता करणे योग्य नाही. पक्षात शिस्त महत्त्वाची आहे.