आईचा जोगवा मागेन...
अनादि निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर मर्दनालागुनी
त्रिविधतापांची करावया झाडणी
भक्तांलागी तू पावसि गे निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा मागेन
नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीची पूजा करण्याचे दिवस. स्त्राr ह्या जीवाच्या देहाच्या ठायी प्रचंड अशी आदिशक्ती वास करून असते हे आजच्या समाजाला पुन्हा एकदा शिकवायची वेळ आलेली आहे असं वाटतं. माणसाला हे पुन्हा पुन्हा शिकवावं लागणार हे आपल्या पूर्वजांनी बहुदा ओळखलं असावं. म्हणून दरवर्षी न चुकता पूर्ण नऊ दिवस स्त्राrशक्तीच्या विविध रूपांचा हा जागर करायची ही प्रथा सुरू केली गेली. तिचा हेतू हाच की स्त्राr ही शक्ती आहे आणि जगावर सर्वात मोठ्या अडचणी आलेल्या असताना त्यांचं निवारण करणारी ही स्त्राrतत्त्वातील देवताच आहे हे सारखं सारखं मनावर ठसवून घेणं अत्यावश्यक आहे.
एखाद्या गोष्टीचं पाठांतर होणं कठीण असेल तर वारंवार तिची उजळणी करीत राहावी लागते. आता गंमत बघा ना! उजळणी हा शब्द घ्या! दिवेही उजळतात. दिशाही उजळतात. पिकत जाणारी फळंसुद्धा उजळतात. देवाची उपकरणेसुद्धा चिंचमिठाने घासली की उजळतात. आठवणींना उजाळा देतात. लखलखीत दिसणाऱ्या वर्णालाही उजळ असं म्हणतात. या सगळ्यांच्या मूळ परिस्थितीत बदल होत राहण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी लख्ख होत राहण्यासाठी त्यांना सतत घासावं लागतं. अनावश्यक गोष्टी सतत काढून टाकाव्या लागतात आणि आवश्यक गोष्टींची सारखी सारखी आठवण करून द्यावी लागते. ही आठवण करून देण्याचा उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव!
हा उत्सव असतो नऊ दिवसांचा. खरंतर कृषकांना आपापल्या घरातल्या बियाण्यांची उत्पादनक्षमता तपासून बघायची असते. त्यासाठीची लॅब टेस्ट करण्याचे हे दिवस असतात. दसऱ्याच्या दिवशी कोणाच्या घरातल्या बाईच्या केसात माळलेले नवरात्रीचे कोंब सर्वात उत्तम आहेत यावरून कोणाच्या घरातलं बियाणं सर्वोत्तम आहे याची आपसूकच परीक्षा होते. स्त्रियांच्या विविध रूपाचा या नऊ दिवसात सन्मान केला जातो. त्यामधील सर्वात महत्त्वाचं रूप असतं ते कुमारिकेचं. आणि क्रमेनं स्त्राrच्या सगळ्याच रूपांचा या नवरात्रात सन्मान केला जातो. मग ती शैलपुत्री असो, स्कंदमाता असो, ललिता असो, सरस्वती असो, लक्ष्मी असो, किंवा काली असो! अध्यात्माच्या मार्गाने बघायचं झालं तर मोक्षाच्या मार्गाकडे कसं जावं यासंबंधीच्या पायऱ्याही ह्या नवरात्रात आपल्याला समजावून सांगितल्या जातात. देवीचं ललितारूप जे असतं ते म्हणजे आयुष्यातलं सौंदर्य असतं. सरस्वती हे रूप जे असतं ती असते आयुष्यातली विद्या आणि कला! महालक्ष्मीचे रूप म्हणजे आयुष्यात कमवायचं धन आणि संपत्ती. आणि कालीमातेचे रूप म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्या, आपलं घर उध्वस्त करू पाहणाऱ्या दुष्टांवर उग्रमंगलासारखं तुटून पडण्याची हिंमत आणि ताकद.
आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायचे असेल तर आधी त्या गोष्टीचा पूर्ण आराखडा आपल्या मनात तयार असावा लागतो. त्यासाठी आपलं मन अत्यंत शांत आणि निर्मोही असावं लागतं. त्यानंतर लागतो तो प्रचंड अभ्यास त्यासोबतच लागतं ते धन. त्यापेक्षाही कणभर जास्ती महत्त्वाची असते ती आपल्या मनगटातील ताकद आणि मनातली हिम्मत. आणि सगळ्यात शेवटी या सर्व गोष्टींचा वापर करण्याची एक इच्छाशक्ती आणि त्याप्रमाणे प्रत्यक्षात केली जाणारी कृती या सगळ्या गोष्टी म्हणजे नवरात्रीच्या सणातून आपल्याला मिळणारा खरा खरा धडा आहे.
ललितापंचमीच्या दिवशी कुंकवाच्या करंड्याच्या झाकणाची पूजा करायची काही काही ठिकाणी पद्धत असते. काही ठिकाणी देवीच्या प्रत्येकच रूपाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. सरस्वतीपूजनाच्या दिवशी विद्यादेवीचं म्हणजेच सरस्वतीचं पूजन केलं जातं. सरस्वतीपूजन हे सर्व शाळांमध्ये दरवर्षी नियमाने आणि प्रेमाने आठवणीने केलं जातं. तर महालक्ष्मीचं पूजन करण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या उकडीचा मुखवटा करण्याचं आणि देवीची पूर्ण मूर्ती गौरीसारखीच घडवून त्यावर तो मुखवटा बसवण्याची पद्धत असते. तिच्यापुढे घागरी फुंकून जागरण केलं जातं. कोकणामध्ये खंडेनवमी किंवा महानवमी खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होत नाही. परंतु घाटमाथ्यावर, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या सर्वच ठिकाणी खंडेनवमी किंवा महानवमी ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी होते. कारण त्या दिवशी वीरांनी आपापली शस्त्रं बाहेर काढून तयार ठेवायची असतात. दसऱ्याच्या दिवशी त्या शस्त्रांवर एकदा का फूल पडलं की तिथून पुढे शस्त्र वापरायला सुरुवात करायची असा संकेत पूर्वी होता. आणि युद्धजन्य परिस्थितीला जिथे जास्ती तोंड द्यावं लागतं त्या भागात या पूजेचं विशेष महत्त्व असतं. समाजात प्रत्येकाचा एक एक रोल ठरलेला असतो. जसं महालक्ष्मीचा सण कोकणात जास्त प्रमाणात साजरा होतो त्याचप्रमाणे नवरात्रात साजरी होणारी षष्ठी आणि त्या दिवशी घातला जाणारा गोंधळ हेही नवरात्राचं एक फार मोठं वैशिष्ट्या आहे.
होऊ दे सर्वदिशी मंगळ झडवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी
उदे गं अंबे उदे करीत हातात दिवटी मशाल घेऊन नाचवीत पूजेभोवती प्रदक्षिणा घालून देवीला आर्जवी स्वरांत आवाहन केलं जातं. ‘अजय अतुल’ची गोंधळ स्पेशल गाणी लोकप्रिय होण्यामागे या लोककलेचा भक्कम वारसा उभा आहे म्हणून यशाची संबळ झडते. लेकराने मागावं आणि आईने ते मोठ्या मायेने लेकराच्या हाती ठेवावं. त्याच्या मुखावर हसू फुललं की आई संतोषते.
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येंघून उघड देवी दार
म्हणून कडकडून हाक गेली की आई दार उघडणारच ना? फक्त तिची अट असते की लेकरा मोह सोड, अभिमान त्याग. तुमच्या जोगव्याची गरज आईसाहेबांना नसते. त्याची गरज तुम्हालाच असते. कारण हा जोगवा मागायचा असतो तो अहंकाररहित होण्यासाठी. दुसऱ्याच्या दारी जाऊन झोळी पसरून माय मला जोगवा द्या म्हणताना सगळा अभिमान बाजूला ठेवावा लागतो. जोगवा म्हणजे योग्य व्हा. नको त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. चांगल्या कार्यासाठी ओंजळ पसरून राहा. चांगल्या कामाला लाजू नका. फुकाचा अभिमान धरू नका. हे शिकवायचं झालं तर खांद्यावरती झोळी द्यावीच लागते. आणि नुसत्या जोगव्याची नव्हे तर रामदासी संप्रदायाची सुद्धा ही प्रथा आहे. ते अशा फेऱ्या करतच असतात.
या सगळ्यामध्ये कारण एकच आहे की समाजाच्या कल्याणासाठी हात पसरायला लागले तरी लाज वाटू नये. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे कितीही धनसंपत्ती असो वा नसो असल्याचा अहंकारही किंवा नसल्याची खंतही वाटू नये. माणसाने स्थितप्रज्ञ होण्यासाठी या प्रथा किती उपयोगी पडतात ना!
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु