‘त्या’ बैठकीवेळी मी तेथे नव्हतो!
मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार पोन्नण्णा यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील उपाहार बैठकीवेळी मी तेथे नव्हतो, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि आमदार ए. एस. पोन्नण्णा यांनी दिले आहे. मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावरून राज्य काँग्रेसमध्ये निर्माण झालेला गोंधळावर सध्या तात्पुरता पडदा पडला आहे. हा वाद परस्पर चर्चेद्वारे मिटविण्याची सूचना हायकमांडने दिल्याने शनिवारी सकाळी सिद्धरामय्या यांच्या ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी शनिवारी सकाळी ‘ब्रेक फास्ट मिटींग’ झाली. सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी डी. के. शिवकुमार यांनी हजेरी लावली. उभयतांच्या भेटीवेळी तेथे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार
ए. एस. पोन्नण्णा देखील होते. त्यामुळे हायकमांडने उभय नेत्यांमधील बैठकीतील निर्णयाचा अहवाल देण्यास पोन्नण्णा यांच्यावर जबाबदारी सोपविली होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, पोन्नण्णा यांनी ब्रेक फास्ट मिटींगवेळी मी तेथे नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे. बेंगळूरमध्ये रविवारी एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोन्नण्णा यांनी, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला ठाऊक नाही. हायकमांच्या सूचनेवरून झालेल्या या गुप्त बैठकीची तुम्हाला जितकी माहिती आहे, तितकीच मलाही ठाऊक आहे. सौहार्दपूर्ण भेटीसाठी ती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले.