असाच मी...चा अट्टाहास सोडायला हवा...
‘स्वभावाला औषध नसतं’ ही म्हण सर्रास वापरली जाते. याचा अर्थ आपण नकारात्मक म्हणजे माणसांचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही असा घेतो. परंतु स्वभावाला औषध नाही म्हणजे स्वभावाला बाह्य उपचारांपेक्षा आत्मपरीक्षण करून बदलाची तयारी दर्शवून प्रयत्न केला पाहिजे, असा अर्थ आहे. ‘असा मी असाच मी’ असे जर आपण कायम राहिलो तर प्रगतीपथावर वाटचाल होणे कठीणच.
मॅडम काय करावं कळत नाही. खरं सांगायचं तर मी आता अगदी कंटाळले आहे. काय सांगू.. माहेरी माझे वडील म्हणजे दुर्वास ऋषींचा अवतार! सासरी आल्यावर जमदग्नींजवळ गाठ पडली. दोघेही कमालीचे तापट. माझ्या सासूबाई चांगल्या आहेत. त्यांना नवऱ्यासंदर्भात काही सांगायला गेलं तर त्या म्हणतात अग लहानपणापासून तो तसाच आहे. त्याचे मित्र त्याला ‘चिडका बिब्बा’ म्हणायचे तू दुर्लक्ष कर.
मॅडम रोजचेच झाले की दुर्लक्ष किती करणार? सारखा राग बरा आहे का? यांचे हे असे आणि माझी लेक कमालीची हळवी! दुनियेचं ओझे जणू हिच्याच डोक्यावर असल्यासारखे वागते. काय करावे सुचत नाही. अनेकदा त्यांच्याजवळ मी या विषयी बोलले. परंतु, हे पहा मी आहे हा असाच आहे. पटलं तर बघा नाहीतर सोडून द्या असं म्हणत पुन्हा पुन्हा चिडतात. मॅडम त्यांच्यात काही बदल होऊ शकतो का हो? की स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात ते खरं आहे?
नवऱ्याच्या तापट स्वभावामुळे ती खूप त्रस्त झालेली होती. खरंतर अन्य कोणत्याही भावनेप्रमाणे राग ही सुद्धा एक स्वाभाविक भावनाच आहे.आपण सारेच कधी ना कधीतरी रागवत असतो परंतु सततचा राग शारीरिक-मानसिक आरोग्य धोक्यात आणू शकतो. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये क्रोधा संदर्भातला एक महत्त्वाचा श्लोक आहे. क्रोधात भवती संमोह: संमोहात् स्मृतीविभ्रम: । स्मृतिभ्रंशात बुद्धीनाश: बुद्धिनाशात प्रणश्यति ।
अर्थात क्रोधामुळे व्यक्तीचा विवेक सुटतो तो सुटल्यामुळे स्मृतीदोष जडतो, स्मृतीदोषामुळे बुद्धीनाश होतो आणि त्यामुळे अखेर व्यक्तीचा विनाश होतो. अति राग त्या माणसाची हानी तर करतोच परंतु त्याच्या सहवासातील व्यक्तींनाही त्याचा त्रास होतो. सुरुवातीच्या उदाहरणातील राग असेल वा अति हळवेपणा, कोणताही भावनातिरेक हा त्रासदायक!
कुठलीही भावना जेव्हा वीरुप पातळीवर जाते तेव्हा सामान्यपणे भावना हाताळता न येणं हे त्याचं कारण असतं. अशा व्यक्ती स्वत: अस्वस्थ होतातच परंतु त्यांचा सहवास इतरांनाही कंटाळवाणा वाटू लागतो. या भावनातिरेकामुळे व्यक्तिमत्व विकासामध्ये अडथळा येतोच आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतात. ज्या माणसांना आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) असतो अशी माणसे आपल्या भावभावनांच्या बाबतीत सजग असतात. समजा एखाद्यावेळी मूड बदलला तरी त्यामध्ये फार काळ रुतून न बसता ते झटकन त्यामधून बाहेर पडतात. स्वजागरुकतेमुळे भावनांचे व्यवस्थापन ते कौशल्याने करताना दिसतात.
काहीजण भावनांमध्ये इतके अडकत जातात की त्यांचा बरा वाईट मूड झटक्यात त्यांचा ताबा घेतो. त्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ होतात व कालांतराने स्वत:ला हतबल समजू लागतात. तर काहीजणं सुरुवातीच्या उदाहरणातील त्याच्यासारखे असतात. स्वत:चा बरा वाईट मूड ते मान्य करतात. परंतु स्वत: बदलायला तयार नसतात. असाच आहे मी पटलं तर पहा असा त्यांचा स्वर असतो. आपण आत्मपरिक्षण केलं तर वरीलपैकी कुठल्या गटात मोडतो, आपल्या भावनांचं नियोजन नेमकं कसं आहे, हे लक्षात येऊ शकेल. प्रत्येकाने आपली वैफल्य सहिष्णुता वाढवायचा प्रामाणिक प्रयत्न केला तर भावभावनांचे गुंते सुटायला नक्की मदत होईल. वैफल्य सहिष्णुता म्हणजेच समजा आपल्याला हवी तशी एखादी गोष्ट घडलीच नाही तर निराश न होता सकारात्मकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. कारण मनाविरुद्ध गोष्टी घडल्यानंतर निराशेची व वैफल्याची येणारी भावना एक तर माणसाला निक्रिय वा आक्रमक!
त्यातूनच अनेक मानसिक वादळे तयार होतात, हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कोणत्याच माणसाचा स्वभाव एका झटक्यात तयार होत नसतो. त्याची सुरुवात खूप आधीपासून होत असते. रागा संदर्भात बोलायचे झाले तर लहानपणी सतत चिडणारे चिडके बिब्बे पुढे सवयीतील सातत्याने जमदग्नी बनतात. केवळ रागच नव्हे तर कोणत्याही भावनातीरेकाच्या बाबतीत हे सूत्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अगदी मुलांच्या बालपणापासून याबाबतीत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
भावभावनांचे व्यवस्थापन कौशल्य प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्यास अनेक अविवेकी विचार, प्रतिक्रिया, कल्पनांचा अट्टाहास यातून सुटका होऊ शकते. जशी निसर्गाच्या वेधशाळेला पावसाच्या आगमनाआधीच चाहूल लागते. पाऊस येण्यापूर्वी एक प्रकारे पावसाचे वातावरण तयार होतं. तसेच राग येण्यापूर्वी माणसाचं मन, शरीर त्याला सूचना देत असतं. अस्वस्थता, त्रासिकपणा, नाराजी, चिडचिड, संताप असे एक एक टप्पे राग गाठत जातो. मन अस्वस्थ होतं. चिडचिड होते. चेहरा बदलू लागतो. अर्थात रागाच्या तीव्रतेनुसार व्यक्ती परत्वे ही लक्षणे वेगवेगळी असू शकतात. भावनिक अस्वास्थ्याची नांदी जर सुरुवातीला ओळखता आली तर त्यावर ताबा मिळवणे शक्य आहे. ‘स्वभावाला औषध नसतं’ ही म्हण सर्रास वापरली जाते. याचा अर्थ आपण नकारात्मक म्हणजे माणसांचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही असा घेतो. परंतु स्वभावाला औषध नाही म्हणजे स्वभावाला बाह्य उपचारांपेक्षा आत्मपरीक्षण करून बदलाची तयारी दर्शवून प्रयत्न केला पाहिजे, असा अर्थ आहे. ‘असा मी असाच मी’ असे जर आपण कायम राहिलो तर प्रगतीपथावर वाटचाल होणे कठीणच.
Anybody can become angry that is easy but to be angry with the right person and to the right degree and at the right time and for the right purpose and in the right way that is not within everybody`s power and is not easy
हे रागाच्या संदर्भातले अॅरिस्टॉटलचे वाक्य विचार करायला लावणारे आहे. भावना या वर्तनासाठी, कृतीसाठी, जगण्यासाठी प्रेरित करत असतात. हे सर्वज्ञातच आहे. भावनांची उत्तम हाताळणी करण्यासाठी योग्य आत्मभान, बदलाची तयारी या गोष्टी आवश्यक आहेत. स्वत:मधील उणीवा जाणून घेऊन ‘असा मी असाच मी’ या अट्टाहासापेक्षा बदलाची तयारी ठेवून प्रयत्न केले तर भावनांचे योग्य नियोजन, हाताळणी करता येईल. स्वत:च्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी ते हितावह ठरेलच परंतु कौटुंबिक वातावरणही उल्हसित आणि प्रसन्न ठेवणारे ठरेल हे मात्र नक्की!!
अॅड. सुमेधा संजिव देसाई