मी मज हरपून...
‘सह्याद्रीच्या पाउलखुणा’ या कार्यक्रमात अगदी जुनं ब्लॅक व्हाइट रेकॉर्डिंग, ज्याच्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर, निवेदन सुधीर गाडगीळ आणि गायिका होत्या रंजना जोगळेकर. क्लासिक रेट्रो पाहणं हा आनंद असतो. साक्षात पंडितजींना निरूपण करताना पाहणं आणि ऐकणं म्हणजे आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध होत असल्याची भावना निर्माण होते. कारण गीतातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, तो शब्द का वापरला आहे त्याचं विवरण आणि विश्लेषण आणि असे शब्द मिळून झालेल्या एकेका ओळीचा अर्थ हे सगळं काही पंडितजी फार सुंदर रीतीने उलगडत नेतात. त्यामुळे मला त्यांच्या गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात.
शब्दांच्या केलेल्या हरकती, खेळ यांकडे माझे जास्त लक्ष जाते. ‘मी मज हरपून बसले ग’ या गाण्याबद्दल मी बोलते आहे. गाण्यात ही, पहिली दोन कड़वी शृंगार रसावर आधारित आहेत, गाणे बहुधा राधेला मनात कल्पून असावे, अतिशय सुंदर गाणं आहे. पहिली दोन कडवी राधा तिच्या आणि कृष्णाच्या शृंगाराबद्दल सांगते आहे तिच्या सखीला, हो सखीलाच. कारण तिच्यासाठीच तर येतो तो सुरेख गं, आणि आशा भोसलेंचा आवाज.
या गाण्यांत तर स्वत: श्रीरंग ही या आवाजाला राधेचाच समजला असता आणि नंतर ‘लगान’ मधल्या ‘राधा कैसे न जले’ मुळे त्याची खात्रीच पटली असेल. साखर झोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग, मी लहान असल्यापासून प्राजक्ताची फुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, म्हणून ‘प्राजक्तासम टिपले ग’ याचा याची देही याची डोळा मी अनुभवलं आहे. आणि त्यात जिने भर घातली ती चंद्रशेखर गोखलेंची ही चारोळी पहा.
प्राजक्त झाडावरुन ओघळतो त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही, हे म्हणजे फारच विषयांतर आहे खरं तर. प्राजक्त आणि चंद्रशेखर गोखले, हे दोन स्वतंत्र विषय आहेत.
दुसऱ्या कडव्यात राधेला दिव्याची वात आणि गजऱ्यातून मोकळ्या होऊन पसरलेल्या मोगाऱ्याच्या कोमेजल्या कळ्या या सारख्याच वाटताहेत. एकीकडे पहाटेच्या मंद वाऱ्याने होणारी वातीची थरथर तर दुसरीकडे तीच थरथर राधेत जागवतो आहे श्रीरंग. राधेच्या या हालचालींनी श्रीरंगाला पण जाग आली आणि त्याने जो स्पर्श केला राधेला, त्या सुख स्वप्नात तिला वाटले की आपण कालिंदी काठी असलेल्या झोक्यावर आहोत काय? पण श्रीरंगाचा स्पर्श आहे हे समजल्यावर तिला प्रथम लज्जेची जाणीव झाली पण नंतर त्या लज्जेतून बाहेर येताच ती उमलली आणि मग ती त्या झोक्यांवर झुलू लागली.
गाण्यामधल्या तिसऱ्या कडव्यातील ‘त्या नभ श्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले ग’ या ओळी भर उन्हाळ्यात पण धुवांधार पावसाची चित्रे उभी करतात. पण या गप्पा चालू असताना बहुधा सासूच्या किंवा कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागते आणि राधा लगेच आपल्या सखीला या शृंगार जालातून बाहेर काढताना म्हणते ‘दिसला मज तो देवकीनंदन’, संपलंच की सारे! शृंगाराच्या दिडदा पासून सपशेल फारकत घेऊन ती आणि सखी चक्क श्रीरंगावरून एकदम देवकीनंदनपर्यंत येऊन पोहोचते.
हे राधेचं गाणं आहे. श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेल्यानंतर ती त्याला कशी विसरू शकणार होती? तिच्या ध्यानी-मनी केवळ कृष्णच होता. खरंतर त्यांचा सहवास एकूण किती वर्षांचा असेल? राधा ही कृष्णापेक्षा वयाने खूप मोठी होती. जेव्हा कृष्ण सात-आठ वर्षांचा होता तेव्हा राधा ही जवळपास पंचवीसएक वर्षे वयाची असावी असं म्हणतात. ती विवाहित होती. तिच्या नवऱ्याचे नाव अनय. श्रीकृष्ण जेव्हा गोकुळ सोडून गेला तेव्हा तर तो केवळ 8-10 वर्षाचा होता म्हणे. याविषयी देखील वेगवेगळे उल्लेख आढळतात. इथं देखील दोघांच्या वयाबद्दलची आणि वयातील अंतराची माहिती थोडी संभ्रमित करते. अगदी पुराणकालीन मंदिरातून दिसणाऱ्या दोघांच्या मूर्ती, पुराण कालीन चित्रातून दिसणारे राधा-कृष्ण यांच्या वयात एवढे अंतर दिसत नाही. राधा-कृष्ण यांची प्रेमकथा, प्रणयाची वर्णने विविध पुराणात वर्णन केली आहेत. विविध काव्यातून देखील तिच्या भक्तीची नव्हे तर त्यांच्या प्रणयाचीच वर्णने येतात. असे असताना त्यांच्या वयात इतके अंतर असेलसे वाटत नाही. त्यांची नक्की वये काय असावीत, ते दोघे किती काळ एकत्र असतील हे एकुणात गौडबंगालच राहिलेले आहे. त्या काळात, स्वत:पेक्षा खूप लहान असलेल्या पुरुषाबरोबर किंवा मुलाबरोबर एका विवाहित स्त्राrचे संबंध असणं, हे एकूण सारंच कवीप्रतिभेला कायमच कुतूहल वाटले आहे.
जेव्हा तिच्या प्राणप्रिय सख्याला, अक्रूर गोकुळातून घेऊन गेला त्या नंतरच राधेचं जीवन एकदम निरस होऊन गेलं. ती यमुनेला पाणी भरायला जायची सख्यांबरोबर, रोजची कामंही करत असेल. पण ध्यानीमनी केवळ आणि केवळ कृष्णच होता. ती त्याच्याच आठवणीत दंग असायची. त्याच्याबरोबर व्यतीत केलेले प्रसंग ती मनोमनी परत परत आठवायची आणि त्यात रंगून जायची. तिला त्याचा स्पर्श आठवायचा, त्याचा गंध आठवायचा. ते बासरीचे सूर तिच्याभोवती रुंजी घालायचे. त्या सावळ्या रंगात ती रंगून असायची. कदाचित इथंच मधुर भक्तीचा जन्म झालाअसावा.
एक प्रवाह असाही आहे की या गाण्यात कवी कल्पना करतो आहे, की ती तिच्या मैत्रिणीला आज पहाटे काय झालं ते सांगते आहे. अगं, आज मला अगदी हरवल्यासारखं झालंय ग.. तो... आज अगदी पहाटेच आला. त्याला पाह्यलं आणि मी भान हरवले. किती सहज आला तो. जणू पहाटेच्या वाऱ्याची झुळूक. अगदी साखरझोपेत होते मी. अचानक माझ्या शयनात आला आणि, अगं चक्क मिठीत ओढलं ग मला. डोळे देखील उघडले नाहीत मी. सारंच कसं ओळखीचं होतं ना. त्याचा धसमुसळेपणा तर कधी अगदी हळूवार स्पर्श. देहभर प्राजक्ताचा सडा पडावा ना, तसं टिपलं त्यानं मला.. किती अलवार.. तोच श्वास.. तोच स्पर्श, त्याच्या लांबसडक बोटांचा, ओठांचा, रेशमी शेल्याचा.. देहभर.... सुगंधून गेले मी. मीही तशीच त्याच्या मिठीत शिरले. सारंच कसं सहज, आपोआप घडलं ग. खरंतर मला कल्पनाही नव्हती, तो येईल. ध्यानी-मनी देखील नव्हते. मथुरेला तो जाऊन सुद्धा किती तरी दिवस झालेआता.
गेलाच ना मला एकटीला टाकून? मी रागावलीचय त्याच्यावर. पुन्हा दिसला तर बोलणार देखील नव्हते त्याच्याशी. आज मात्र तो आल्यावर, सारा राग, सारा विरह, सारा अपमान विसरले. देहभान हरवले ग त्या सावळ्याच्या मिठीत. पासून ते अगदी दीपकळीगत थरथरले गं पर्यंत आणि थेट मग दिसला तो देवकीनंदनपर्यंत कवीने शब्दातून व्यक्त केलेले राधेचे भाव, संगीतकाराने इतके परफेक्ट उचलले आहेत आणि आशाताईंनी त्यांच्या स्वरातून ते अगदी तसेच व्यक्त केले आहे. तीनही प्रतिभावंत संपूर्णपणे एकरूप झाले आहेत इथं. आणि ही ओळ आपल्या रक्तातून वहाते आहे तोवर, पुढचे शब्द अलगद उतरतात. खरंखोटं विचार न करता राधेचं समर्पण समजून घ्यावं, साऱ्या नितीमत्ता उल्लंघूनही देवत्व लाभलेला कृष्ण जाणावा. देहभान विसरून समर्पित व्हावं, असं प्रेम अनुभवायला मिळणं हे पूर्वपुण्य आहे.
- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु