ब्रेन रॉट...
ऑक्सफर्डने यंदाच्या म्हणजेच 2024 मधील सर्वोत्तम शब्द म्हणून ब्रेन रॉट या शब्दाची केलेली निवड कालसुसंगतच म्हटली पाहिजे. या शब्दाला लाभलेले विविध कंगोरे आणि त्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थछटा पाहता ऑक्सफर्डच्या शब्दकोशातही त्याचा समावेश होणे संयुक्तिकच म्हणायला हवे. ऑक्सफर्डकडून दरवर्षी सर्वोत्तम म्हणून एका शब्दाची निवड केली जाते. यंदा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रकाशित होणाऱ्या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत समावेश करण्यासाठी सहा शब्दांची निवड अंतिम सूचित करण्यात आली होती. चार तज्ञांच्या समितीकडून ही नावे निश्चित करण्यात आली. त्यामध्ये ब्रेन रॉटसह डेम्युर, डायनॅमिक प्रायसिंग, लोर, रोमँटसी, स्लोप आदी शब्द शर्यतीत होते. अंतिम निर्णयासाठी नागरिकांचे मतदान, भाष्य आणि अतिरिक्त विश्लेषणाचा विचार करण्यात आला. त्यानुसार 37 हजारहून अधिक जणांची मते मागविण्यात आली. इंटरनेटवरील वेगवेगळ्या मंचांवर ब्रेन रॉट या शब्दाच्या लोकप्रियतेत 230 टक्के वाढ झाल्याचे आढळल्यानंतर याच शब्दावर अखेर सर्वोत्तमतेचे शिक्कोमोर्तब करण्यात आले. वास्तविक ब्रेन रॉट या शब्दाची व्याप्ती अतिशय मोठी आहे. मुळात हा काही केवळ तांत्रिक शब्द नाही. सोशल मीडियाचा अतिवापर, बौद्धिकदृष्ट्या अनुपयुक्त असलेल्या माहितीचा भडिमार, असा आशय या शब्दातून प्रतिबिंबित होतो. खरंतर या शब्दामागचा इतिहास खूप मोठा आहे. प्रसिद्ध अमेरिकन लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांच्या 1884 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जगप्रसिद्ध वॉल्डन या पुस्तकामध्ये या शब्दाची उत्पत्ती सापडते. थोरो हे महान विचारवंत होते. मानवी आयुष्य आणि त्यांच्या अर्थपूर्णतेविषयी त्यांचे सतत चिंतन सुरू असे. त्यातूनच 1845 ते 1847 अशा दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी मानवी वस्तीपासून दूर जंगलात एकटेच राहण्याचा निर्णय घेतला. जंगलातील वॉल्डन नावाच्या तलावाजवळ त्यांनी लाकडापासून घर तयार केले. या दोन वर्षांमध्ये थोरो भौतिक जीवन आणि तेथील सुखसुविधांपासून दूर राहिले. स्वत:च्या कष्टातून त्यांनी अन्न पिकवले आणि त्यावरच आपली गुजराण केली. या काळात थोरो यांनी साधेपणा जपलाच. शिवाय मनन, चिंतन आणि आत्मपरीक्षणावरही भर दिला. तांत्रिक प्रगतीतील अनावश्यक कोलाहलावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बदल हा मानवी जीवनाचा स्यायीभाव आहे. माणसाच्या उत्पत्तीपासूनच बदलाला सुऊवात झाली. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात बदलाचा हा वेग प्रचंड प्रमाणात वाढला. मात्र, एकीकडे हे नवनवीन तंत्रज्ञान येत असताना दुसरीकडे त्याच्या अतिवापरामुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या. थोरोने हाच कोलाहल लेखणीत पकडला आणि त्याला ब्र्रेन रॉट ही संज्ञा वापरली. ती संज्ञा किती समर्पक आहे, हे आता लक्षात येते. मागच्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांनी अवघा अवकाश व्यापून टाकला आहे. अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि जपानपासून भारतापर्यंत प्रत्येक देश डिजिटल माध्यमांच्या मिठीत अडकला आहे. एकीकडे या तंत्रज्ञानाचे प्रचंड फायदे पहायला मिळतात. वेळ, पैसा, श्रम यात मोठी बचत होते. मानवी जीवन सुखकर होण्यास डिजिटल माध्यम साह्याभूत ठरते, यात काडीमात्र शंका नाही. परंतु, दुसरीकडे या माध्यमांच्या आहारी गेल्याने मानवी आयुष्य समस्यांच्या गर्तेत सापडल्याचेही दिसून येते. माणसाच्या प्रगतीत मानवी बुद्धीचा प्रमुख वाटा राहिला आहे. जे इतर प्राण्यांना जमले नाही, ते माणसाने करून दाखवले, ते याच बुद्धीबळावर. परंतु, या नवमाध्यमामुळे माणसाची विचार करण्याची शक्तीच कमी होत असल्याचे पहायला मिळते. माणसाच्या बुद्धीला, विचारांना ताणच मिळणार नसेल, तर तिला गंज चढण्याचा धोका संभवतो. हे बघता ही तंत्रज्ञानाची गुलामगिरी मानव जातीपुढचे प्रमुख आव्हान असेल. याशिवाय डिजिटल माध्यमांचा मानसिक क्षमता आणि एकाग्रतेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते. मानसिक क्षमता किंवा एकाग्रताच हरवली, तर माणसापुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. दैनंदिन जगण्यातही अडथळे येऊ शकतात. त्याचबरोबर अशा व्यक्तींना मानसिक थकवा आणि अस्वस्थताही जाणवू शकते. यातून अनेक आजारांनाही आमंत्रण मिळण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे या संकटाला ब्रेन रॉट असे दिलेले नाव चपखलच ठरावे. ऑक्सफर्ड लँग्वेजेसचे अध्यक्ष पॅस्पर ग्रॅथवोहल यांनी ब्रेन रॉट हे आभासी धोक्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. आपण आपला रिकामा वेळ कसा वापरतो, याबद्दलची भावना आणि चिंताही यातून व्यक्त होते. खरंतर आपल्या अवतीभवती सर्वत्र आज ब्रेन रॉटसारखीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. सगळीकडून कसला ना कसला तरी भडीमार अथवा मारा होत आहे. रशिया विऊद्ध युक्रेन असेल किंवा इस्राईल विऊद्ध पॅलेस्टाईन संघर्ष असेल. त्याचे मानसिक आघात माणूस म्हणून आपल्या सर्वांवर होतच असतात. अगदी महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे उदाहरण घ्या. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले. महाविकास आघाडीचा दाऊण पराभव झाला. तर महायुतीला सत्ता मिळाली. मात्र, अजूनही राज्यात काय होणार, याचा काही अंदाज लागत नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावाला गेले, ठाण्यात परतले, ऊग्णालयात गेले, मुख्यमंत्रिपदाचे नाव अजून निश्चित नाही, आज शपथविधी, उद्या शपथविधी अशा बातम्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मेंदूचा पार भुगा व्हायची वेळ आली आहे. मात्र, तरीही यासंदर्भात बातम्यांचा मारा डिजिटल माध्यमातून सुरूच आहे. या गुंत्यामध्ये राज्यातील जनताही कळत नकळत गुरफटल्याचे दिसून येते. यातून ब्रेन रॉट या शब्दाच्या जंजाळात आपण सगळे कसे अडकलोय, यावरच प्रकाश पडतो. म्हणूनच ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत केवळ एका शब्दाचा समावेश झाला, एवढ्यापुरतेच आपण याकडे पाहू नये. तर यातून निर्माण झालेल्या आव्हानांना कसे सामोरे जायचे, याचाही विचार केला पाहिजे