For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मी हरलेय...अलविदा कुस्ती..

07:05 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मी हरलेय   अलविदा कुस्ती
Advertisement

विनेश फोगाटचा धक्कादायक निर्णय : देदिप्यमान कारकिर्दीचा करुण अंत

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे पॅरिस ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर निराश झालेले देशवासीय झोपेत असतानाच विनेशने धक्कादायक निर्णय घेतला. ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशने निवृत्तीची घोषणा केली आहे. आई कुस्तीने माझ्यावर विजय मिळवला, मी हरले, मला माफ करा.. तुमची स्वप्नं आणि माझं धैर्य, सगळं काही भंग पावलं आहे, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद उरलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व अशा आशयाची पोस्ट विनेशने लिहिली आहे. विनेशचा हा निर्णय धक्कादायक असून भारतीय चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement

29 वर्षीय महिला कुस्तीपटूने उपांत्य फेरीच्या सामन्यात क्यूबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला होता. 50 किलो कुस्ती प्रकारात रौप्य पदकही निश्चित होते. किमान एक तरी पदक निश्चित असल्याचा विश्वास संपूर्ण देशाला वाटत होता. परंतु फायनलपूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे दिसून आले. परिणामी तिला ऑलिम्पिक मधून अपात्र करण्यात आले. ऑलिम्पिक फायनलपूर्वी 100 ग्रॅम वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते, त्यानंतर विनेशने हा निर्णय घेतला. यासह तिचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्नही अधुरे राहिले. तिने 2016, 2020 आणि 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु तिला एकदाही पदक जिंकता आले नाही.

विनेशचे अपील क्रीडा लवादात दाखल

विनेश फोगाटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे तिला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता जाहीर करावं, अशा विनंतीची याचिका दाखल केली आहे. इतकंच नाही तर सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही तिने केली. मात्र सीएएसने सुवर्ण पदकाच्या सामन्याची विनंती फेटाळली आहे. यामुळे आता सीएएसकडून विनेशच्या संयुक्त रौप्य पदकाच्या विनंतीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष असणार आहे. सीएएसने विनेशच्या बाजूने निर्णय दिल्यास तिला रौप्य पदक मिळेल.

विनेशने दु:खी मन:स्थितीत निर्णय घेऊ नये

विनेश फोगटने दु:खी मन:स्थितीत खेळातून निवृत्तीसारखे निर्णय घेऊ नयेत. मला तिच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून कळले आणि तिने स्वत:हून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने मला धक्का बसला आहे. म्हणून मी तिला भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने विनंती करतो की, तिने दु:खी मनस्थितीत निर्णय घेऊ नये आणि एकदा मानसिकदृष्ट्या सावरल्यानंतर तर्कशुद्ध निर्णय घ्यावा. आम्ही तिच्याशीही बोलू.

- संजय सिंग, भारतीय कुस्ती महासंघ प्रमुख

विनेश फेरविचार करेल अशी आशा

2012 मध्ये माझे वजन 200 ग्रॅमने जास्त असल्याने मी आशियाई चॅम्पियनशिप देखील खेळू शकले नाही. अशा अनेक उदाहरणे आहेत जिथे कुस्तीपटूंना जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे. कुस्तीतील नियमांमुळे हे घडले हे संपूर्ण जगाला माहीत आहे. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याच्या निर्णयामुळे देश दु:खी झाला आहे आणि आम्हाला आशा आहे की, ती तिच्या निर्णयावर पुनर्विचार करून 2028 मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घेईल आणि तिच्या आईचे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल. माझ्या वडिलांनी (महावीर फोगाट) देखील सांगितले आहे की, ती एकदा घरी आली की, ते तिला समजावण्याचा प्रयत्न करतील.

- बबिता फोगाट, चुलत बहीण व कुस्तीपटू

विनेश हरलेली नाही,तिला पराभूत करण्यात आलेय

विनेश, तू हरलेली नाहीस, तर तुला पराभूत करण्यात आले आहे. आमच्यासाठी तू नेहमीच विजेती राहशील आणि भारताची कन्या असण्याबरोबरच तू भारताची शानही आहेस.

- बजरंग पुनिया, कुस्तीपटू

विनेश एक दिवस पदक आणेल

मला काहीही म्हणायचे नाही. देशाने सुवर्णपदकाची अपेक्षा केली होती. नियम अस्तित्वात आहे. पण एखाद्या कुस्तीपटूचे वजन 50 वा 100 ग्रॅमनी जास्त असेल, तर त्याला सहसा खेळू दिले जाते. मी देशातील लोकांना सांगू पाहेन की, त्यांनी निराश होऊ नये. ती एक दिवस पदक आणेल हे निश्चित. मी तिला पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयार करेन.

- महावीरसिंग फोगाट

Advertisement
Tags :

.