मुख्यमंत्र्यांबाबत चुकीचे काही बोललोच नाही!
क्रीडामंत्र्यांची ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका
पणजी : आपल्या विरोधात जे काही प्रसिद्ध, प्रकाशित झाले ते सर्व पत्रकारांनी केलेला विपर्यास होता. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांबाबत आपण चुकीचे काही बोललोच नाही. आपण केवळ आदिवासी कल्याण खात्याच्या प्रशासनाबाबत भाष्य केले होते, अशा शब्दात स्वत:ची बाजू मांडताना क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका घेतली. रविवारी फोंडा येथे झालेल्या ‘आदिवासी प्रेरणा’ दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी, आदिवासी कल्याण खात्याचे प्रशासन डळमळले असल्याचा आरोप करून खात्याच्या कारभारावर टीका केली होती. त्याही पुढे जाताना त्यांनी खात्याचे कार्यालय असलेल्या ‘श्रमशक्ती’ भवन इमारतीत खाली कंत्राटदारांकडून चिरीमिरी मिळाल्यानंतरच त्यांच्या फाईल्स वर पोहोचविल्या जातात, असा दावाही केला होता.
विरोधकांना मिळाली टीकेची संधी
त्यांचे हे वक्तव्य जाहीर होताच विरोधकांनी त्यावरून सरकारवर सडकून टीका केली. ‘सरकारमधील भ्रष्टाचाराची मंत्र्याकडून पोलखोल’, ‘हा तर सरकारला घरचा अहेर’, यासारख्या असंख्य वाक्यप्रचारांमधून ही टीका झाली होती. हे आरोप आणि टीकेमुळे अखेर मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांना बोलावेच लागले होते व त्यांनी मंत्री गावडे यांच्यावर कारवाईची हमी दिली होती. मात्र ’प्रेरणा दिन’ कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याच दिवशी मंत्री गावडे गोव्याबाहेर गेले होते. बुधवारी ते गोव्यात परतले. त्या दरम्यानच्या काळात राज्यात विविध तर्कवितर्कांना अक्षरश: ऊत आला होता. गावडे यांची गच्छंती अटळ असल्याच्या अटकळीही त्यातून बांधल्या जात होत्या, भाकिते वर्तविण्यात येत होती. परंतु मंत्री गावडे यांनी ती सर्व फोल ठरविली आहेत.
पत्रकारांच्या मनात आकस : गावडे
‘उटा’ आंदोलनावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपनेच आम्हाला खंबीर साथ दिली होती. अशावेळी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबाबत आपण चुकीचे काही बोलूच शकत नाही. त्याशिवाय ते आपले चांगले मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल काय म्हटले आहे यावर मी भाष्य करू शकत नाही. परंतु त्यांच्याबद्दल मी काही वाईट बोलणार नाही. मी जे काही बोललो ते पत्रकारांनी विपर्यास करून लिहिले. अर्थाचा अनर्थ केला. माझ्याबद्दल पत्रकारांच्या मनात नाहक आकस असेल तर त्याला मी तरी काय करणार? असे गावडे यांनी नमूद केले.
भेटीत काय झाले ते त्यांनाच विचारा : मुख्यमंत्री
मंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी आपली भेट घेतल्याची पुष्टी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र त्या भेटीत काय झाले, ते त्यांनाच विचारा, असे म्हणत त्यांनी त्या वादावर अधिक भाष्य करणे टाळले.
आज आपण ऐकणार मंत्र्याची बाजू : नाईक
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याप्रश्नी बोलताना, या प्रकरणाची आमच्या केंद्रीय नेतृत्वाला पूर्ण माहिती आहे. पक्षाध्यक्ष या नात्याने आपणही त्यांना त्यासंदर्भात वैय्यक्ति माहिती दिली आहे. यासंदर्भात आज दि. 29 मे रोजी आपण गोविंद गावडे यांची बाजू ऐकणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.