पूर्ण कालावधीसाठी मीच सीएम!
सिद्धरामय्या यांचा पुनरुच्चार : नवी दिल्लीत पत्रकार परिषद : भेटी-गाठी सुरूच
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये चर्चा रंगली असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. विविध योजना आणि राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी त्यांनी दिल्लीला धाव घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात मुख्यमंत्रिपद रिक्त नाही, मीच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री असल्याचा पुनरुच्चार केला आहे. राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांचा राज्यातील आमदारांच्या भेटीमागचा उद्देश मुख्यमंत्री बदल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी निर्माण केला आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. कर्नाटक प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनीच राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे मुख्यमंत्रीबदल हा विषय नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. राज्य काँग्रेस प्रभारींनीच मुख्यमंत्री बदलाची अटकळ फेटाळून लावल्याने अफवांना जागा नाही. पक्षात मुख्यमंत्री बदलावर चर्चाही झालेली नाही, असे ते म्हणाले.
अधिकार हस्तांतराचा करार झालेला नाही!
पक्षश्रेष्ठींचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारला पाहिजे, वरिष्ठांच्या निर्णयाला आम्ही दोघेही कटिबद्ध असल्याने अनेकदा सांगितले आहे. सरकारला अडीच वर्षे होत असताना मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराचा विषय येणे साहजिकच आहे. परंतु, अधिकार हस्तांतराबाबत कोणताही करार झालेला नाही. मी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचे नुकताच सांगितले होते. असे असताना प्रसारमाध्यमे अफवा का पसरवत आहेत? खुद्द उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीच मुख्यमंत्रिपद रिक्त नसल्याचे सांगितले आहे, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.
आमदारांचे मत हा पक्षाचा निर्णय नव्हे!
काँग्रेसमधील काही आमदार मुख्यमंत्री बदलाविषयी मते मांडत असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले, काही आमदार स्वत:ची वैयक्तिक मते व्यक्त करत आहेत. परंतु, त्यांची मते हा पक्षाचा निर्णय नाही. अधिकार हस्तांतराच्या चर्चेला अर्थच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. डी. के. शिवकुमार आणि मी याचा पुनरुच्चार केला आहे. कर्नाटकात मीच मुख्यमंत्री आहे. डी. के. शिवकुमार किंवा इतर आमदारांनी मुख्यमंत्रिपदाची आशा बाळगली असेल तर त्यात गैर नाही. मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये गोंधळ नाही : डॉ. महादेवप्पा
सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड आमदारांनी केली आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनले आहे. तेच मुख्यमंत्री असताना अकारण चर्चा कशाला, अशी प्रतिक्रिया मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी दिली आहे. हायकमांडने जो निर्णय घेतला, तेच सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षात गोंधळ नाही. काहीजण मत व्यक्त करत आहेत. हायकमांडने त्यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या आहेत, असेही महादेवप्पा म्हणाले.