महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सर्व कर्तव्यकर्मात मी असतोच

06:16 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व समाज जिथे एकविचाराने गुण्यागोविंदाने नांदतो तेथे संस्कृती नांदत असते. अशा संस्कृतीत सर्वजण एकमेकांची कदर करून, एकमेकांबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करत पुढे जात असतात. बाप्पा आपल्याला सर्वसमावेशक संस्कृतीचं रक्षण कसं करावं हे सांगताना म्हणतात, आपल्यावर उपकार करणाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याला प्रत्येक संस्कृतीत सर्वोच्च प्राधान्य असतं. त्यामुळे आपापसातील बंधुभाव जागृत राहतो व अडीअडचणीच्यावेळी तुमच्यावरील प्रेमाखातर लोक मदतीला येतात. तसेच तुम्हीही इतरांच्या अडचणीच्यावेळी त्यांच्या मदतीला धावून जाता. दुसरा कुठं अडचणीत येईल हे ओळखून त्याच्या मदतीला त्याठिकाणी आधीच उपस्थित असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण होय. संस्कृतीचा एक भाग म्हणून आपल्याला मिळालेल्यातला काही भाग इतरांना अर्पण करून उरलेला भाग आपण केलेल्या कर्तव्यरुपी यज्ञाचा प्रसाद म्हणून भक्षण करावा. जे शिजवलेलं सर्व स्वत:च खातात ते पापच भक्षण करत असतात. जो इतरांचा वाटा त्यांना न देता स्वत:च खात असेल तो चोर समजावा. परमपद मिळण्यासाठी इतकी साधी आणि सोपी दिनचर्या माणसाने पाळावी. आपण सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरे आहोत. साहजिकच त्यांना आपल्या सर्वांची काळजी असते. म्हणून ईश्वराने माणसाच्या उपजीविकेसाठी अन्नसाखळी तयार केलेली आहे ती कशी काम करते ते बाप्पा आपल्याला पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

ऊर्जो भवन्ति भूतानि देवादन्नस्य संभव ।

Advertisement

यज्ञाच्च देवसंभूतिस्तदुत्पत्तिश्च वैधत ।। 14 ।।

अर्थ- अन्नापासून भूतमात्र उत्पन्न होतात, देवापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञापासून देवांची उत्पत्ती होते आणि यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून.

विवरण- ईश्वराने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचं वर्णन बाप्पा या श्लोकात करतायत. अन्नसाखळीच्या माध्यमातून ईश्वराने जीवसृष्टीच्या पोटापाण्याची सोय केलेली आहे. हे चक्र अव्याहतपणे असंच चालू राहण्यासाठी मनुष्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं आवश्यक आहे असा निष्कर्ष त्यातून निघतो. मनुष्य जे जे कर्तव्य करतो त्या प्रत्येक कर्तव्यकर्मात मी आहे हे लक्षात ठेव असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

ब्रह्मणो वैधमुत्पन्नं मत्तो ब्रह्मसमुद्भव ।

अतो यज्ञे च विश्वस्मिन् स्थितं मां विद्धि भूमिप ।। 15 ।।

अर्थ- ब्रह्मदेवापासून कर्म उत्पन्न झाले, माझ्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणून हे राजा, सर्व यज्ञांमध्ये मी आहे असे जाण.

विवरण- बाप्पा म्हणतात, ब्रम्हदेवाने कर्माची निर्मिती केली आणि माझ्यापासून ब्रह्मदेव निर्माण झाले म्हणजे ब्राह्मदेवांना कर्म निर्माण करायची प्रेरणा मीच दिली असंही म्हणता येईल. त्यामुळे त्या कर्मातही मी आहे असं उघड म्हणता येईल. प्रत्येकाला मी कर्म नेमून देत असतो आणि प्रत्येकाला ते करावं लागतं. ज्याप्रमाणे एखादा नोकर मालकाने दिलेले कार्य निमुटपणे करतो त्याप्रमाणे वाट्याला आलेलं कर्म ईश्वरानं दिलेलं काम समजून करावं आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता ते त्याला अर्पण करावं. कर्मयोगाच्या सिद्धांतातला कार्यकारण भाव बाप्पांनी येथे उलगडून सांगितला आहे. आता हे आपोआपच स्पष्ट होतं की, काम त्यांचंच आहे म्हंटल्यावर ते त्यांना जसं हवंय, जेवढ्या प्रमाणात हवंय त्याप्रमाणात ते त्या त्या मनुष्याकडून करून घेतात पण हे लक्षात न घेता करत असलेलं काम ही आपली जबाबदारी आहे असं मनुष्य समजत असतो आणि त्याच्या यशाने हुरळून जातो किंवा अपयशाने खचून जातो. हे योग्य नाही. त्यामुळे तो संसार चक्रात पुन:पुन्हा गुंतत जातो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो.

क्रमश: 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article