For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावधान! सावधान!

05:22 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावधान  सावधान
Advertisement

सध्या गुरु पूजनाचे उत्सव गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र चालू आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले अशा गुरुजनांचे पूजन, गौरव या दिवशी केला जातो. पण वास्तविक गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात आणि व्यासदेवांचे प्रतिनिधी म्हणून गुरुचा गौरव आणि पूजन केले जाते याची जाणीव फारच कमी लोकांना आहे.

Advertisement

व्यासदेवांनी भौतिक प्रगती व्हावी, यासाठी मार्गदर्शन केले नाही तर हे भौतिक जग कसे नश्वर आहे, आत्मा सत्य आहे आणि भगवान श्रीकृष्ण अथवा राम यांची भक्ती हा जीवनाचा उद्देश आहे अशी शिकवण आपल्या ग्रंथातून दिली आणि प्रामाणिक गुरु हाच उपदेश आपल्या शिष्यांना करतो. परंतु कलियुगाच्या प्रभावाने तथाकथित गुरु व्यासदेवांनी केलेला उपदेश विसरून आपला स्वत:चा उपदेश करतात अशा तथाकथित गुरुबद्दल तुकाराम महाराज म्हणतात,

नाही शात्राधार पात्रापात्र नेणे। उपदेशून घेणे द्रव्य कांही ।। तुका म्हणे ऐसे गुऊशिष्य जाण। विठोबाची आण नरका जाती ।।

Advertisement

प्रामाणिक गुरुचे कर्तव्य आहे की आपल्या शिष्याला या भौतिक जगातील अंधकारातून बाहेर काढणे, या जगातील दु:ख, आसक्ती, मोह या बंधनातून मुक्त करणे आणि हे केवळ शुद्ध हरिनामाच्या साहाय्यानेच साध्य होऊ शकते याची  जाणीव करून देणे. समर्थ रामदास स्वामी अशा सांसारिक बंधनाबद्दल सावधान करताना म्हणतात, सावधान सावधान वाचे बोला रामनाम। दहावर्ष ती बालपण वीस वर्षे हो तारुण्य। अंगी जडला अभिमान तेंव्हा न घडे साधन।। तीसाची होय भर्ती दारा पुत्र ते लाभती। त्यातची पडे भ्रांती न कळे स्वऊप स्थिती। चाळीस वर्षे जाहली डोळा चाळीसी आली। नेत्रासी भुली पडली येता न दिसे जवळी। पन्नास वर्ष होति शामकेश शुभ्र होती। हालती दाताच्या पंक्ती त्याला म्हातारा म्हणती।। साठीची होय गणना उठता बैसवेना बैसता उठवेना। बापुडा होय दैन्यवाना चारी वीस मिळो नी ऐंशी। बापुडा होय विदेशी जळावीन मासोळी जैसी होय कासाविसी। नवावरी दिले पुज्य सुख राहिले दुजे। म्हणतसे माझे माझे शेवटी जड झाले ओझे। शतवारी पुऊष जाहला राजहंस उडोनी गेला देह कोरडाच पडला। जन म्हणती उचला उचला प्राणी भुमिभार झाला। या लागी रामदास सांगतो सज्जनास धरा सद्गुऊची कास। या सर्वांचे सार आहे, जीवन दु:खमय आहे आणि हरिनाम हाच कलियुगाचा धर्म आहे हे आध्यात्मिक गुरु शिकवतो.

संत तुकाराम महाराजसुद्धा अशाच आशयाचा संदेश आपल्या अभंगातून देतात. बाळपणी ऐसीं वऊषें गेलीं बारा। खेळतां या पोरा नानामतें।।1।। विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं। चंपे पेंड घडी एकीबेकी।।ध्रु.।। हमामा हुंबरी पकव्याच्या बारे। खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी।।2।। सेलडेरा आणि निसरभोंवडी। उचली बाळी धोंडी अंगबळें।।3।। तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें। मग ताऊण्य आलें गर्वमूळ।।4।। अर्थात

“बालपणी खेळता खेळता अनेक मित्रांबरोबर बारा वर्षे निघून जातात. विटी, दांडू चेंडू, लगोऱ्या, चंपे कुरघोडी पेंडघडी, ऐकी बेकी हमामा हुंबरी हुगल्याचीवारे मोठे भोवरे शिवाशिव सेल डेरा निसर भोवंडी हे सर्व खेळ तसेच मोठे धोंडी बळाने उचलणे अशा अनेक प्रकरचे खेळ तो खेळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे अनेक प्रकारचे खेळ खेळून बालपण जाते व मग सर्व गर्वाचे मूळ असलेले ताऊण्यपण येते”. आज खेळांची नावे आणि प्रकार बदलले असली तरी आशय तोच आहे. पुढील अभंगात वर्णन येते ताऊण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ।।1।। अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ।।ध्रु.।। हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ।।2।। श्वानाचिया परी हिंडे दारोदारिं । पाहे परनारी पापदृष्टी ।।3।। तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ।।4।। अर्थात “तारुण्य लागले की त्या तारुण्याच्या मदात मनुष्य कोणालाही मानत नाही. सोडलेल्या वळूप्रमाणे आपल्या मस्तीत तो मुसमुसत असतो म्हणजे अहंकाराच्या मस्तीत तो मुसमुसत असतो. चापून चोपून डोक्याला पागोटे बांधून रेड्याप्रमाणे तो लोकांमध्ये भरकटत असतो. हातात दीड पान घेतो आणि अभिमानेने वर तोंड करून चालतो. मोठ्या माणसांस सन्मान देत नाही. अशी माणसे कुत्र्याप्रमाणे दारोदार हिंडतात. परनारीकडे पाप दृष्टीने पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात या अशा माणसांची मोठी हानी होते कारण त्याचा जन्म इतरांची टवाळी करण्यात गेला.”

म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ।।1।। खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ध्रु.बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ।।2।। सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कंटाळा येणें आम्हां ।।3।। तुका म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ।।4।।

अर्थात “म्हातारपणी माणसाला सर्दी, पडसे, खोकला असे विविध प्रकारचे रोग जडतात व याच विचाराने तो मनुष्य म्हातारपणी आपल्या कपाळाला हात लावून विचार करत बसतो. त्याचे तोंड खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे झालेले असते आणि नाकातून नेहमीच शेंबडाचा पूरच गळत असतो. त्याच्या मुखाद्वारे व्यवस्थित शब्दही बाहेर पडत नाही कारण त्याच्या कंठामध्ये खूप कफ साठलेला असतो आणि तो सारखा गडगड वाजत असतो. आणि त्याचे असे रूप बघून शेजारचे म्हणतात, हा मेला मरेना का म्हणून याने आम्हाला कंटाळा आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता त्यामुळेच तुम्ही सर्व काम बाजूला सारा आणि मुखाने क्षणाक्षणाला ‘राम राम’ असे स्मरण करा.

“आणखी एका अभंगात म्हणतात काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण 1।। देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ।।ध्रु.।। काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ।।2।। कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ।।3।। कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ।।4।। कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ।।5।। काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ।।6।। काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ।।7।।

अर्थात “या संसाराची संगती करून एकेकाची काय दुर्दशा झाली आहे हे लोकांना ठाऊक नाही काय? या लोकांना काय काय म्हणून समजून सांगावे? या संसाराची दुर्दशा हे डोळ्यांनी पाहतात, कानाने ऐकतात आणि पुराणात काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत आहे. हे शरीर खरे आहे की जाणार आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. आपले स्वहित कशात आहे हे सगळ्यांना का बरे कळू नये आणि बालक व तारुण्य वृद्धावस्था यामध्ये किती दोष आहेत हेही सर्वांना माहीत आहे. आप्तइष्ट हे यांना इतके का आवडले आहेत. अखेरीस कोणी कोणाच्या कामाला आले आहे काय? हा उत्तम असा जन्म या लोकांनी का बरे वाया घातला आहे? का बरे हे लोक राम राम म्हणत नाहीत? कित्येक लोकं मरताना हे पाहत असतात तरीही या लोकांना या संसाराच्या शाश्वतपणाचा भ्रम पडलेला का आहे? तुकाराम महाराज म्हणतात, काळाने आपल्या बलाने या लोकांना वज्रपाशाशी बांधले तर हे लोक काय करतील. त्यामुळे नेहमी हरिभजन करावे असे महाराज सांगतात व हरिभजन केल्यानेच आपण तरू शकतो.”

गुरुची जबाबदारी वर्णन करताना व्यासदेव श्रीमद भागवतमध्ये सांगतात ( भा 5.5.18) गुरुर्न स स्यात्स्वजनो न स स्यात्पिता न स स्याज्जननी न सा स्यात् ।दैवं न तत्स्यान्न पतिश्च स स्या-न्न मोचयेद्य: समुपेतमृत्युम् ।। अर्थात “जो मनुष्य आपल्यावर आश्रित असणाऱ्यांचा जन्म-मृत्यूच्या चक्रातून उद्धार करू शकत नाही, त्याने कधीही एक आध्यात्मिक गुरु, पिता, पती, माता किंवा आराध्य देव होऊ नये.” यासाठी गुरु स्वीकारताना सावधान! सावधान! आंधळेपणा करू नका.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.