मीच माझ्यासवे
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाचि वाद आपणासी
असं म्हणणाऱ्या तुकोबांनी इतकं काही म्हणून ठेवलंय की त्यासंबंधी स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून जर विचार करत बसलो तर कुणाही प्रामाणिक माणसाला माझ्यातला मी कळेल. आपण खरं तर दुनियादारी करत हिंडत असतो, सगळ्यांचं सगळं काही आपल्याला माहीत असतं. माहीत नसतो तो आपल्यातला मी...कारण सदैव जगाशी जोडलेलं राहण्यासाठी आपण इतके हपापलेले असतो की जगापासून वेगळे पडून पाठी राहण्याचा आपल्याला अक्षरश: फोबिया असतो. ‘सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग’ हाच असतो...मग आपले राजेशबाबू कितीही वेळा आपल्या सखीला,
कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना
छोडो बेकार की बातों में कहीं बीत न जाये रैना
असं सांगत राहीनात का! आपण आपलं सोडत नसतो. शाळेत असण्याच्या वयापासूनच माणसाला समूह वर्तनाची सवय लागते आणि ते नैसर्गिक आहे पण काहीवेळा असं होतं की आपल्या शिक्षकांना काही सांगायचं झालं किंवा विचारायचं झालं तरी एकट्याने कसं जायचं हा प्रश्न पडतो आणि मग चारपाच जणांचा गट त्यासाठी मुक्रर होतो. आणि मग ‘तू बोल...तू बोल’ करीत रहातात. प्रत्यक्ष कुणीतरी तोंड उघडेपर्यंत मधली सुट्टी खतम्.. आयुष्यात आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी जोडीला कुणीतरी हवंच असतं पण जेव्हा ते हवं असणं अवलंबित्वात परावर्तित होतं तेव्हा स्वत:ला स्वत:ची सोबत असते याची जाणीव करून घेण्याची वेळ आलेली असते. या आपुलाचि वाद आपणासी अवस्थेची आपल्याला आयुष्यात अनेकदा गरज भासते. कारण आपल्याला जेव्हा अपयश येतं किंवा यश पचवणं अवघड होतं तेव्हा परखड आत्मपरीक्षण करणं अगदी गरजेचं असतं. खरं तर मित्र यासाठीच असतो. पण शेवटी घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी त्याचं त्यानं प्यावं, असं आहे. म्हणजे मित्राचा खरा आणि स्पष्ट सल्ला मानायचा झाला तर आपण एकांतात बसून विचार करावाच लागतो. स्वत:ला काही प्रश्न विचारावेच लागतात. मी कुठे जातो आहे? ते योग्य आहे की नाही हे स्वत:ला विचारावं लागतं. त्यासाठी सर्वोत्तम मित्र म्हणजे मनाचा आरसा. आपलं मन आपल्याशी पहिल्या फटक्यात खरंच बोलतं. म्हणजे पुन्हा आपली सोबत आपल्याला. मीच माझ्यासवे रे...आहे ना गंमत..
गाण्याच्या मोठमोठ्या मैफिली होतात. एकावेळी अनेक कलाकार एकत्र बसतात. समूहाने परफॉर्मन्स देतात. ते परफेक्ट होणं गरजेचं असतं. त्यासाठी कंडक्टर उभा असतो. सर्वजण योग्यवेळी योग्य त्या एकाच सुरात एकरूप अवस्थेत एकत्रित गायन वादन करतील याची पूर्ण काळजी त्याला घ्यावी लागते. त्यासाठी अर्थातच उच्च दर्जाची एकाग्रता अतिशय आवश्यक असते. ही एकाग्रता तेव्हाच साधते जेव्हा पक्का रियाज असतो आणि रियाज म्हणजे काय? पुन्हा मीच माझ्यासवे रे...
कारण तो जास्तसा एकट्याने करायचाच भाग. तसंच त्यात सहभागी कलाकारांचं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वत:च्या तालासुराशी, दिलेल्या गाण्याशी परफेक्ट असता तेव्हाच इतरांशी नाळ जुळवून घेता येणार ना? त्यासाठी आधी एकट्याने रियाज आणि मग समूहाने रियाज असं दोन्ही करुन आधी स्वरालय आणि पुढे समन्वय असं दोन्ही साधावं लागतं. यासाठी आधी स्वत:ला स्वत: परफेक्ट असण्याचा आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. म्हणजे पुन्हा एकला चलो रे ची सवय हवी म्हणजे मीच माझ्यासवे रे...
ज्योत मी लावीन। जीव तेववीन
कंठ उगाळीन। सुरांसाठी
शिरावर ज्योत। उरामध्ये पोत
जळणारी वात। देह माझा
इतकी तयारी हवी म्हणजे स्वत:ला कुरतडत बसण्याची सवय लागावी लागते.. पण स्वत:ची स्वत:ला ओळख असणं आपलं बलस्थान आणि कच्च्या बाजू नीट माहीत असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. नाहीतर जगायचं कसं? म्हणून आपल्याला काहीवेळ कटाक्षाने स्वत:साठी काढावाच लागतो. आणि म्हणूनच आपला सहवास आपल्याला. स्वत:ची सोबत स्वत:ला असं करायचं असतं. आयुष्य म्हणजे असं असतं की
उम्रे दराज माँग के लाए थे चार दिन
दो आरजू में कट गए, दो इंतजार में
लगता नहीं है दिल मेरा उजड़े दयार में
वाट बघता दोन सरले, दोन सरले चिंतनी असे हां हां म्हणता चार दिवस निघून जातात. पण खरं तर हां हां म्हणता नाही जात ते! एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा उपभोगता आली नाही किंवा समाधान नाही मिळालं तर आपण म्हणतो की किती लवकर आयुष्य सरलं, माझं जगायचं राहून गेलं. पण नकोशा, नावडत्या गोष्टी जर कराव्या लागल्या तर तेव्हा मात्र दिवस जाता जात नाहीत आणि सोबत राहणारे सर्व सोबती होतातच असं नाही. खरं तर ते होतच नाहीत. मग एवढं मोठं भलंदांडगं आयुष्य एकट्याने काढायचं? पाडगावकर म्हणतात तसं
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी
असंच शोधायचं? छे... आपल्याला मन आहे मेंदू दिलाय परमेश्वराने त्याचा उपयोग करायचा आणि
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा
असं सुरेश भटांसारखं म्हणता आलं पाहिजे आणि देवकी पंडित यांच्यासारखं व्यक्त होता आलं पाहिजे. पण मग त्यासाठी स्वत:च स्वत:ला अलिप्त उभं राहून पहायला शिकलं पाहिजे ना? मेल्या माणसानं स्वत:च्या देहाची गंमत पाहत उभं राहावं तसं. खरं तर त्यासाठी उच्च दर्जाची साधना लागते. अगदी सगळ्या गर्दीतून स्वत:ला काही काळ वेगळं काढावं लागतं. आपल्या इवल्या चौकोनात वेगळं बसून विचार करावा लागतो. एकटेपणा बऱ्याचदा वाट्याला येतो. तेव्हा स्वत:चीच स्वत:ला सोबत करावी लागते. काहीवेळा अख्खं जग विरोधात उभं ठाकतं. तेव्हा आपल्या योग्य विचारांची कास घट्ट धरून पुढे चालायचं असतं. काहीवेळा कटू अनुभव, कडू आठवणी पिच्छा सोडत नाहीत तेव्हा मग
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
असं म्हणत गात गात चालत राहायचं. मग यासाठी आपली स्वत:ची सोबत स्वत:ला असते. इतर कोणत्याही सोबतीपेक्षा ती जास्त विश्वसनीय असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती कुणा अन्य व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसते. अशी सवय लावून घेतलेली व्यक्ती म्हणते
मीच माझ्यासवे, मीच माझ्यासवे
मीच माझ्यातला नित्य माझ्यासवे
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु