ह्युंडाईच्या कार विक्रीमध्ये वाढ
एप्रिलमध्ये विक्री 63 हजार पार : टाटाचीही विक्री जाहीर
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कार निर्मिती क्षेत्रातील कंपनी ह्युंडाई यांनी एप्रिल महिन्यामध्ये 63 हजार 701 वाहनांची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता ही विक्री 9.5 टक्के अधिक आहे. 2023 च्या एप्रिलमध्ये ह्युंडाई मोटर इंडिया यांनी 58,201 वाहनांची विक्री केली होती. याच दरम्यान एप्रिलमध्ये निर्यातीमध्ये ह्युंडाईने चांगली कामगिरी पार पाडली आहे. 13500 कार्सची एप्रिलमध्ये निर्यात करत 59 टक्के इतकी दणदणीत वाढ नोंदली आहे. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 8500 वाहनांची निर्यात कंपनीने केली होती. कंपनीची देशांतर्गत कार विक्री 50,201 इतकी राहिली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी सलग चौथ्या महिन्यामध्ये कंपनीने देशांतर्गत कार विक्रीमध्ये 50000 चा यशस्वी टप्पा गाठला आहे. क्रेटा, वेन्यू आणि एक्सटर यासारख्या कार्सनी भारतामध्ये एकंदर कार विक्रीमध्ये 67 टक्के इतका लक्षणीय वाटा उचलला आहे.
टाटाची विक्री 77 हजारहून अधिक
दुसरीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रातील आणखीन एक कंपनी टाटा मोटर्सनेदेखील एप्रिल मधील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. टाटा मोटर्सने एप्रिल महिन्यामध्ये अकरा टक्के वाढीसह एकूण 77521 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात 69,599 वाहनांची विक्री कंपनीने केल्याची माहिती आहे. एकंदर प्रवासी वाहनांची विक्री मागच्या महिन्यात दोन टक्के वाढून 47 हजार 983 इतकी राहिली होती तर व्यावसायिक वाहनांची विक्री 29538 इतकी नोंदली गेली आहे.