कोलारमधील काँग्रेसच्या उमेदवारीवरून हायड्रामा
मंत्र्यासह चार आमदारांचा राजीनाम्याचा पवित्रा : मुनियप्पांच्या जावयाला तिकीट देण्यास विरोध
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोलार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या तिकिटावरून काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मंत्री के. एच. मुनियप्पा यांच्या जावयाला तिकीट देण्यात येत असल्याची चाहूल लागल्याने त्यावर काही जणांनी आक्षेप घेतला असून उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, काँग्रेसचे आमदार कोट्टूर मंजुनाथ, नंजेगौडा, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव व विधान परिषद सदस्य नजीर अहमद, अनिलकुमार यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. आमदारांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे बुधवारी विधानसौधमध्ये हायड्रामा झाला.
कोलार मतदारसंघातून मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याचा विचार काँग्रेसश्रेष्ठींनी चालविला होता. परंतु, मुनियप्पा यांनी नकार दिला. त्यामुळे मुनियप्पा यांनी जावयाला तिकीट मिळवून देण्याचे प्रयत्न केले. त्यात ते सफल ठरले. बुधवारी सकाळी मुनियप्पा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी जावयाला तिकीट मिळाल्याची खात्री त्यांनी केली.
मुनियप्पांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यास डॉ. एम. सी. सुधाकर यांच्यासह चार आमदारांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. डॉ. एम. सी. सुधाकर, कोट्टूर मंजुनाथ, नंजेगौडा, नजीर अहमद, अनिलकुमार हे राजीनामा देण्यासाठी विधानसौधमध्ये आले. हे समजताच कोलार जिल्हा पालकमंत्री भैरती सुरेश यांनी विधानसौध गाठत डॉ. सुधाकर यांच्यासह राजीनामा देण्यास आलेल्या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवरून बोलून आमदारांना राजीनामा देण्यापासून रोखले. सायंकाळी मुख्यमंत्री बेंगळूरला येतील. तेव्हा ते कोलार मतदारसंघातील तिकीट वाटपावरून निर्माण झालेली नाराजी दूर करतील. कोलारमधील उमेदवाराविषयी अद्यात अंतिम निर्णय झालेला नाही. याविषयी पक्षाध्यक्ष देखील चर्चा करणार आहे, असे भैरती सुरेश यांनी सांगितले.
राजीनामा देण्यासाठी विधानसभाध्यक्ष व विधान परिषद सभापतींच्या कार्यालयात राजीनामापत्र घेऊन आलेल्या नजीर अहमद, अनिलकुमार, कोट्टूर मंजुनाथ व नंजेगौडा यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून माघार घेतली. समझोता बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे या आमदारांनी सांगितले.
मंत्री डॉ. सुधाकर, आमदार कोट्टूर मंजुनाथ, नंजेगौडा हे राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांच्या कार्यालयात आले. मात्र, सभाध्यक्ष मंगळूरला असल्याचे समजताच मंगळूला जाण्यासाठी या तिघांनी विमानाचे तिकीट बुक केले. परंतु, यु. टी. खादर यांनी तिघांशी फोनवरून चर्चा करताना सायंकाळी बेंगळूरला येत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिन्ही आमदारांचा मंगळूर प्रवास रद्द झाला. दुसरीकडे विधान परिषद सदस्य नजीर अहमद व अनिलकुमार राजीनामापत्र घेऊन सभापतींच्या कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी आपले राजीनामापत्र प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दाखविले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून राजीनामापत्र न देता परत निघून गेले.