रोमांचक सामन्यात हैदराबाद एका धावेने विजयी
राजस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव : सामनावीर भुवनेश्वर कुमारची अप्रतिम गोलंदाजी : जैस्वाल, परागची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था /हैदराबाद
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा अवघ्या एका धावेने पराभव केला. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 200 धावांपर्यंत मजल मारु शकला. शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी करत हैदराबादच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी 2 धावांची गरज होती, त्यावेळी भुवनेश्वरने विकेट घेत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादचा संघ पुन्हा चौथ्या स्थानी आला आहे. हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. फॉर्मात असलेला जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांना भोपळाही फोडता आला नाही. अवघ्या एका धावेवर राजस्थानचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांनी राजस्थानचा डाव सावरला. जैस्वालने 40 चेंडूमध्ये 67 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि सात चौकार ठोकले. तर रियान परागने 49 चेंडूमध्ये 77 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार षटकार आणि आठ चौकाराचा समावेश होता. रियान पराग आणि यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची शानदार भागीदारी केली. रियान पराग आणि जैस्वाल पाठोपाठ बाद झाल्यानंतर पॅट कमिन्स आणि नटराजन यांनी एकापाठोपाठ एक राजस्थानला चार धक्के दिले. नटराजनने यशस्वी जैस्वाल आणि शिमरन हेटमेयर यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर पॅट कमिन्सने ध्रुव जुरेल आणि रियान परागचा पत्ता कट केला. नटराजन आणि कमिन्स यांनी अखेरच्या षटकात भेदक मारा करत सामना फिरवला. हेटमायर 13, पॉवेल 27 धावा काढून बाद झाले. ध्रुव जुरेलला एकच धाव काढता आली. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 13 धावांची गरज होती पण भुवनेश्वर शानदार गोलंदाजी करत हैदराबादला एका धावेने विजय मिळवून दिला.
रेड्डी , हेडची शानदार अर्धशतके
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनमोलप्रीत सिंह यालाही छाप पाडता आली नाही. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावा काढून बाद झाला. पण हेड आणि रेड्डी यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. ट्रेविस हेडने 44 चेंडूमध्ये संयमी 58 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. रेड्डीने आक्रमक खेळताना 42 चेंडूत 3 चौकार व 8 षटकारासह नाबाद 76 धावांची खेळी साकारली. हेड बाद झाल्यानंतर हेड व क्लासेनने संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. या दोघांनी 70 धावांची भागीदारी केली. क्लासेनने अवघ्या 19 चेंडूत 42 धावा चोपल्या. हैदराबादकडून आवेश खानने दोन बळी घेतले.
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 3 बाद 201 (ट्रेव्हिस हेड 58, अभिषेक शर्मा 12, अनमोलप्रीत सिंग 5, नितीश कुमार रेड्डी नाबाद 76, हेन्रिक क्लासेन नाबाद 42, आवेश खान 2 तर संदीप शर्मा 1 बळी).
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 7 बाद 200 (यशस्वी जैस्वाल 67, जोस बटलर 0, संजू सॅमसन 0, रियान पराग 77, हेटमेयर 13, रोव्हमन पॉवेल 27, अश्विन नाबाद 2, भुवनेश्वर कुमार 3 तर पॅट कमिन्स व नटराजन प्रत्येकी 2 बळी).