For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादचा पुन्हा धावांचा पाऊस

06:56 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादचा पुन्हा धावांचा पाऊस
Advertisement

दिल्ली कॅपिटल्सवर 67 धावांनी विजय : सामनावीर ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी खेळी  

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विक्रमी खेळीसह सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ऑल आऊट करत 67 धावांनी विजय विजय मिळवला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या पॉवरप्लेमधील सर्वाधिक 125 धावांच्या खेळीसह हैदराबादने 267 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या फलंदाजांनीही हे लक्ष्य गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे त्यांचा डाव 199 धावांवर आटोपला. दिल्लीकडून मॅकगर्कने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले, पण 65 धावा करत तो बाद झाला. दरम्यान, हैदराबादचा हा पाचवा विजय असून गुणतालिकेत त्यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. होम ग्राऊंडवरील पराभवामुळे दिल्लीची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सने 267 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ 16 धावा करुन बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नर देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने केवळ 1 रन केली. यानंतर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेलनं डाव सावरला. मॅकगर्कने 18 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकारांसह 65 धावांची धुव्वाधार खेळी केली. तर अभिषेक पोरेलने 22 चेंडूच 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात ही जोडी लागोपाठ बाद झाली. यानंतर आलेला ट्रिस्टन स्टब्जही स्वस्तात परतला. कर्णधार ऋषभ पंतने 35 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले पण त्याला इतर खेळाडू साथ मिळाली नाही. अखेरीस दिल्लीचा संपूर्ण संघ 199 धावांवर ऑलआऊट झाला. हैदराबादकडून नटराजनने सर्वाधिक 4 बळी घेतले.

हेड-शर्माने धु धु धुतले

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माचं वादळ पाहायला मिळालं. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पंतचा हा निर्णय हैदराबादच्या ओपनर्सनी चुकीचा ठरवला. हेड आणि अभिषेक शर्माने वादळी खेळी करत हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने सहा ओव्हरमध्ये 125 धावा करत इतिहास रचला. पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या हैदराबादच्या नावावर नोंदवली गेली. पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची या दोघांनी चांगलीच धुलाई केली. ट्रेव्हिस हेडने अवघ्या 16 बॉलमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. हेडच्या आयपीएल कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक विक्रमी ठरलं.

पॉवरप्लेनंतर दिल्ली कॅपिटल्सनं कमबॅक केले. सातव्या ओव्हरमध्ये हैदराबादला पहिला धक्का बसला. कुलदीप यादवने अभिषेक शर्माला 46 धावांवर बाद केले. शर्माने 6 सिक्स आणि 2 चौकार मारले.  यानंतर फलंदाजीला आलेला मॅरक्रम देखील चांगली फलंदाजी करु शकला नाही. तो एक रन करुन बाद झाला. याच षटकात कुलदीप यादवच्या बॉलिंगवरच हेड बाद झाला. यानंतर अक्षर पटेलने हेनरिक क्लासेनला देखील बाद केले. हेडने सर्वाधिक 32 चेंडूत 6 षटकार व 11 चौकारासह सर्वाधिक 89 धावा केल्या. क्लासेनने 15 धावांचे योगदान दिले.

यानंतर नितीश कुमार रेड्डी  व शाहबाज अहमद यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. रेड्डी ने 27 चेंडूत 37 धावा ठोकल्या तर अहमदने 29 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारासह नाबाद 59 धावांचे योगदान दिले. अखेरच्या काही षटकात अहमदने हाणामारी करत संघाला 20 षटकांत 7 बाद 266 धावापर्यंत मजल मारुन दिली. दिल्लीकडून कुलदीप यादवने 55 धावांत 4 गडी बाद केले. मुकेश कुमार व अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक : सनरायजर्स हैदराबाद 20 षटकात 7 बाद 266 (हेड 89, अभिषेक शर्मा 46, मॅरक्रम 1, क्लासेन 15, नितीशकुमार रेड्डी 37, शाहबाज अहमद नाबाद 59, समाद 13, कमिन्स 1, अवांतर 5, कुलदीप यादव 4-55, मुकेशकुमार 1-57, अक्षर पटेल 1-29).

दिल्ली कॅपिटल्स : 19.1 षटकांत सर्वबाद 199 (मॅकगर्क 65, अभिषेक पोरेल 42, ऋषभ पंत 44, पृथ्वी शॉ 16, नटराजन 19 धावांत 4 बळी, मार्कंडेय व रेड्डी  प्रत्येकी दोन बळी).

आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा

प्रथम फलंदाजीला आल्यानंतर हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये 103 धावा केल्या. या भागीदारीत हेडचे 62 आणि अभिषेकचे 40 धावांचे योगदान राहिले. यानंतर या दोघांनी सहाव्या ओव्हरचा खेळ संपल्यांतर एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद पॉवरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली. हैदराबादने केकेआरचा रेकॉर्ड ब्रेक केला. हैदराबादने बिनबाद 125 धावा केल्या आणि 2017 मधील केकेआरचा आरसीबीविरुद्ध 105 धावांचा पॉवरप्लेमधील विक्रम मोडीत काढला.

आयपीएलच्या पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या

125/0 - हैदराबाद वि दिल्ली, 2024

105/0 - केकेआर वि आरसीबी, 2017

100/0 - सीएसके वि पंजाब, 2014

मॅकगर्कने झळकावले यंदाच्या आयपीएलमधील वेगवान अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सच्या 22 वर्षीय फ्रेझर-मॅकगर्कने अवघ्या 15 चेंडूच अर्धशतक झळकावले आहे. हैदराबादने दिलेल्या 267 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या फ्रेझरने विस्फोटक फलंदाजी करत 15 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील हे चौथ्या क्रमांकाचे सर्वात कमी चेंडूत केलेले अर्धशतक आहे. तर यंदाच्या हंगामातील वेगवान अर्धशतक ठरले आहे.

आयपीएल 2024 मधील सर्वात जलद अर्धशतक (चेंडूनुसार)

15 चेंडू -  मॅकगर्क वि हैदराबाद, दिल्ली,

16 चेंडू - अभिषेक शर्मा वि मुंबई इंडियन्स, हैदराबाद

16 चेंडू -  ट्रॅव्हिस हेड वि दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली,

Advertisement
Tags :

.