हैदराबाद-केकेआर आज आमनेसामने
क्वालिफायर 1 : हाय स्कोअरिंग लढतीची अपेक्षा, विजयी संघ थेट फायनलमध्ये जाणार
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
उंच भरारी घेतलेले कोलकाता नाईट रायडर्स आणि अंदाज बांधणे कठीण असलेले सनरायझर्स हैदराबाद हे आज मंगळवारी येथे पहिल्या ‘क्वालिफायर’मध्ये एकमेकांना भिडतील. या दोन्ही संघांचे समान वैशिष्ट्या म्हणजे त्यांची आयपीएल 2024 ची मोहीम ‘पॉवर हिटिंग’वर अधारित राहिलेली आहे,
‘केकेआर’ हा यावर्षीचा प्लेऑफमध्ये पोहोचलेला पहिला संघ ठरला, तर सनरायझर्सने रविवारी पंजाब किंग्जला चार गडी राखून पराभूत करून राजस्थान रॉयल्सला मागे टाकत 17 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. 70 सामन्यांच्या लीग फेरीतील या दोन अव्वल संघांना गेल्या 10 दिवसांतील आपापल्या काही लढती पावसात वाहून जाताना पाहावे लागलेले आहे. प्लेऑफच्या लढतीची तयारी करण्यासाठी आवश्यक वेळेचा अभाव हे देखील त्यांच्यासमोर एक अनोखे आव्हान असेल.
केकेआर आणि सनरायझर्स यांना ही लढत खेळण्यासाठी हजारो किलोमीटर्सचे अंतर पार करून येण्यासाठी फक्त एक दिवसाचा वेळ मिळालाय. कारण दोन्ही संघ रविवारी लीग फेरीच्या शेवटच्या दिवशी खेळले होते. सनरायझर्सने मागील सामन्यात पंजाबवर सर्वसमावेशक विजय मिळवलेला असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. केकेआरच्या बाबतीत त्यांचा शेवटचा पूर्ण सामना 11 मे रोजी झाला होता. श्रेयस अय्यरच्या ‘केकेआर’चे शेवटचे दोन साखळी सामने पावसात वाहून गेले. त्यापूर्वी त्यांनी चार सामने सलग जिंकले होते.
गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या केकेआरसमोर (19 गुण) दुसरे मोठे आव्हान हे फिल सॉल्टची उणीव भरून काढण्याचे आहे. यष्टिरक्षक सॉल्ट हा त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा (435 धावा) फलंदाज असून त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी इंग्लंडच्या संघातून खेळण्यासाठी आयपीएलचा निरोप घेतला आहे. सॉल्ट आणि केकेआरचा अव्वल स्थानी असलेला फलंदाज सुनील नरेन (461 धावा) यांची जोडी विनाशकारी ठरली होती आणि कर्णधार अय्यर (287) फारसा मोठा प्रभाव पाडू शकलेला नसला, तरी मधल्या फळीची त्यांना चांगली साथ मिळाली होती.
राजस्थानविरुद्धचा सामना पावसात वाहून गेल्याने केकेआरला सॉल्टच्या जागी रहमानुल्ला गुरबाजला नरेनसह अव्वल स्थानी पाठविण्याची संधी हुकली. नितीश राणाच्या फॉर्ममुळे त्यांच्या मधल्या फळीला अधिक मजबुती प्राप्त झालेली आहे, तर आंद्रे रसेलच्या रुपाने त्यांच्याकडे स्फोटक फिनिशर आहे. ‘फायरपॉवर’च्या बाबतीत सनरायझर्सही तोडीस तोड आहे. त्यांच्या ट्रॅव्हिस हेड (533 धावा) आणि अभिषेक शर्मा (467) या दोघांनीही 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा जमविलेल्या आहेत. अभिषेकने यंदा एकूण 41 षटकार खेचले आहेत.
हैदराबादला तिसऱ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठीमध्ये एक विश्वासार्ह पर्याय सापडला आहे. याव्यतिरिक्त हेन्रिक क्लासेनने पंजाबविरुद्धच्या महत्त्वपूर्ण खेळीसह आपल्याला सूर परत सापडल्याचे संकेत दिले आहेत. केकेआरकडे जरी मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याच्या साथीला चांगला फिरकी मारा असला, तरी सनरायझर्सच्या कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजीनेही वेळोवेळी त्यांची छाप पाडलेली आहे. अहमदाबाद येथे गेल्या वर्षी खेळविण्यात आलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये दिसून आल्याप्रमाणे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांना येथे अधिक यश मिळाले आहे.
संघ : कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रहमान, ए. गझनफर.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश रे•ाr, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, झाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.