हैदराबादने केली केकेआरची शिकार
आयपीएल : सामनावीर क्लासेनच्या 39 चेंडूत 105 धावा, हेडचीही धमाकेदार खेळी : केकेआरचा शेवट पराभवाने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सनरायझर्स हैदराबादने अखेर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेतला. हंगामातील शेवटच्या सामन्यात सनरायझर्सने आपली पूर्ण ताकद दाखवत, गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याचा 110 धावांनी पराभव केला. क्लासेन व हेडच्या तुफानी खेळीच्या जोरावर हैदराबादने 278 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 168 धावांत गारद झाला. 39 चेंडूत नाबाद 105 धावांची खेळी करणाऱ्या क्लासेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. अभिषेक 16 चेंडूत 32 धावा काढून आऊट झाला. पण, तो बाद झाल्यानंतर ट्रेव्हिस हेडने केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेताना 40 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. हेडची विकेट पडल्यानंतर क्लासेनने आपले गीअर्स बदलले. त्याने 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह, क्लासेन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला. हा उजव्या हाताचा फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिला. क्लासेनने 105 धावांच्या खेळीत एकूण 7 चौकार आणि 9 षटकार मारले. तर, इशान किशनने 29 धावांचे योगदान दिले. या जोरावर हैदराबादने 5 विकेट गमावून 278 धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासात तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीतील पहिल्या तीन मोठ्या धावसंख्याही एसआरएच संघानेच केल्या आहेत.
केकेआरचा संघ 168 धावात गारद
279 धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. सुनील नरेनने (31) निश्चितच काही चांगले फटके खेळले, पण चौथ्या षटकात त्याची विकेट पडली. यानंतर, रहाणेही सहाव्या षटकात आऊट झाला. रहाणेच्या बॅटमधून फक्त 15 धावा आल्या. यानंतर, जणू काही विकेट पडण्याची एकच झुंबड उडाली असे वाटत होते. डी कॉक सातव्या षटकात आणि रिंकू सिंग आठव्या षटकात आऊट झाला. रिंकूने 9 धावा केल्या. आठव्या षटकात रसेलही खाते न उघडता बाद झाला. यानंतर मनीष पांडेने आक्रमक खेळताना 37 धावा केल्या तर हर्षित राणाने 34 धावा करत त्याला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव 19 व्या षटकात संपला आणि हैदराबादने 110 धावांनी सामना जिंकला. उनादकट, हर्षित दुबे व इशान मलिंगा यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक :
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 3 बाद 278 (अभिषेक शर्मा 32, ट्रेव्हिस हेड 76, क्लासेन 39 चेंडूत नाबाद 105, इशान किशन 29, अनिकेत वर्मा नाबाद 12, सुनील नरेन 2 बळी, वैभव अरोरा व हर्षित राणा प्रत्येकी एक बळी)
केकेआर 18.4 षटकांत सर्वबाद 168 (सुनील नरेन 31, रहाणे 15, मनीष पांडे 37, हर्षित राणा 34, उनादकट, इशान मलिंगा व हर्ष दुबे प्रत्येकी 3 बळी).