हैदराबादचा आरसीबीवर धमाकेदार विजय
आयपीएल : सनरायझर्सचा 42 धावांनी विजय : इशान किशनची 94 धावांची वादळी खेळी : पॅट कमिन्सचे 3 बळी
वृत्तसंस्था/लखनौ
येथील एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आरसीबीवर 42 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने इशान किशनच्या वादळी खेळीच्या जोरावर 231 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 189 धावांत ऑलआऊट झाला. या पराभवामुळे आरसीबीने गुणतालिकेत अव्वलस्थानी जाण्याची संधी गमावली असून गुणतालिकेत त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. या सामन्यात दुखापतग्रस्त रजत पाटीदारच्या जागेवर आरसीबीचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुनरागमन करणाऱ्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीला फलंदाजीला येत हैदराबादला चांगली सुरुवात करुन देताना अर्धशतकी सलामी दिली. परंतु, चौथ्या षटकात अभिषेक शर्माला लुंगी एन्गिडीने फिल सॉल्टच्या हातून झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 34 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ पुढच्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला भूवनेश्वर कुमारने रोमारियो शेफर्डच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. हेडने 10 चेंडूत 17 धावा केल्या.
इशान किशनचे शतक हुकले
हेड बाद झाल्यानंतर इशान किशन आणि क्लासेनची जोडी जमली. क्लासेन आक्रमक खेळत असताना इशानने त्याला साथ दिली होती. त्यांच्यात 48 धावांची भागीदारी झाली. ही जोडी जमलेली असतानाच 9 व्या षटकात क्लासेनची विकेट सुयश शर्माने घेतली. क्लासेनने 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 24 धावा केल्या. त्यानंतर अनिकेत वर्मानेही इशानला साथ दिली. परंतु, वादळी खेळ करणाऱ्या अनिकेतला कृणालने 12 व्या षटकात बाद केले. त्याचा झेल भुवनेश्वर कुमारने घेतला. अनिकेतने 9 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 26 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, इशान किशनने मात्र किल्ला लढवताना 48 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारासह नाबाद 94 धावा फटकावल्या. इशानला शतक मात्र पूर्ण करण्यात अपयश आले. या जोरावर हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावत 231 धावा केल्या. पॅट कमिन्स 13 धावांवर नाबाद राहिला.
आरसीबीचा पराभव
विजयासाठी मिळालेल्या 232 धावांचा पाठलाग करताना आरसीबीला विराट व फिल सॉल्ट या दोघांनी मिळून पावरप्लेमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 80 धावा जोडल्या. त्यानंतर विराट कोहली 43 धावा करत माघारी परतला. विराट बाद झाल्यानंतर फिल सॉल्टने मात्र दुसऱ्या बाजूने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह 62 धावा चोपल्या. यानंतर रजत पाटीदार सपशेल अपयशी ठरला. त्याला केवळ 18 धावा करता आल्या तर जितेश शर्माने 24 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने आरसीबीचा डाव 19.5 षटकांत 189 धावांत आटोपला. हैदराबादकडून पॅट कमिन्सने 3 गडी बाद करत ऑरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 231 (अभिषेक शर्मा 34, इशान किशन 48 चेंडूत नाबाद 94, क्लासेन 24, अनिकेत वर्मा 26, शेफर्ड 2 बळी, भुवनेश्वर, एन्गिडी, कृणाल पंड्या व सुयश शर्मा प्रत्येकी 1 बळी) आरसीबी 19.5 षटकांत सर्वबाद 189 (फिल सॉल्ट 62, विराट कोहली 43, रजत पाटीदार 18, जितेश शर्मा 24, पॅट कमिन्स 3 बळी, इशान मलिंगा 2 बळी, उनादकट, पटेल, हर्ष दुबे, नितीश कुमार रे•ाr प्रत्येकी एक बळी).
आरसीबीची तिसऱ्या स्थानी घसरण
आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला असला तरी त्यांच्यासाठी त्यापूर्वीचे सामनेही महत्वाचे आहेत. या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने 12 सामने खेळले होते. या 12 सामन्यांत त्यांनी आठ विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. आरसीबीचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आरसीबीच्या संघाचे 17 गुण झाले होते. या 17 गुणांसह आरसीबीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर आता आरसीबीला दुसरे स्थान गमवावे लागले आहे. आरसीबीची आता पॉइंट्स टेबलमध्ये घसरण झाली असून आता ती तिस्रया स्थानावर घसरण झाली आहे.