20 वर्षांपर्यंत पत्नीशी न बोलणारा पती
जपानच्या नारा शहरात राहणारे ओटौ कटायमा आणि त्यांची पत्नी यूमी यांची अविश्वसनीय कहाणी आहे. हे दांपत्य एकाच घरात राहिले, तीन मुलांचे संगोपन पेले, परंतु दोन दशकांपर्यंत त्यांनी परस्परांशी एक शब्दही संभाषण केले नाही. ओटौ यांनी अचानक पत्नी यूमीशी बोलणे बंद केले. यूमीने अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ओटौ केवळ मान हलवून, राग व्यक्त करत इशाऱ्यांनीच प्रतिसाद देत होते. त्यांची मुले मोठी झाली, परंतु या मुलांनी कधीच आईवडिलांना सामान्य स्वरुपात बोलताना पाहिले नव्हते.
त्यांच्यात लढाई नव्हती, तसेच द्वेषही नव्हता. तरीही ओटौ यांनी मौन सोडले नाही. याचदरम्यान त्यांनी स्वत:च्या तिन्ही मुलांचे एकत्रित पालनपोषण पेले. काळ उलटत गेला, मुले मोठी होत गेली. परंतु जेव्हा या परिवाराचा सर्वात छोटा मुलगा हायस्कूललला पोहोचला, तेव्हा त्याने या रहस्याची उकल करण्याचा निर्णय घेतला. त्याने आईवडिलांमधील या अजब अंतराचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलाने जपानी टीव्ही चॅनेलशी संपर्क साधला. टीव्ही निर्मात्यांनी यावर काम केले आणि सरप्राइज मीटिंगची योजना आखली. चॅनेलने दोघांची भेट त्याच पार्कमध्ये करविली जेथे ते युवावस्थेत डेटवर जात होते. या भेटीला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. सुरुवातीला ओटौ यांनी नेहमीप्रमाणे नजर भिडणे टाळले आणि गप्प बसून राहिले. यूमी देखील शांत होत्या. परंतु काही मिनिटातच ओटौ यांनी 20 वर्षांचे मौन सोडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांनी जे कारण सांगितले ते हैराण करणारे होते. ईर्ष्येमुळे मी यूमीशी बोलत नव्हतो. यूमी सर्व लक्ष मुलांना देते आणि मला एकाकी असल्याची जाणीव करून दिली जात होती, मी पत्नीसाठी महत्त्वपूर्ण राहिलो नाही असे वाटू लागले होते. प्रारंभी जी नाराजी होती, ती हळूहळू ईर्ष्येत बदलली, यातूनच यूमीशी बोलणे बंद केल्याचे ओटौ यांनी मान्य केले. पतीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर यूमीने त्यांना माफ केले आणि एक दिवस ओटौ अवश्य बोलतील असा विश्वास होता असे म्हटले.