पतीनेच पत्नीचा खून केल्याचा संशय
उगार बुद्रुक येथील घटना : पालकांची कागवाड पोलिसात तक्रार : तपास सुरू
वार्ताहर/कागवाड
उगार बुद्रुक येथील गर्भवती विवाहितेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. चैताली किरणगी (वय 22) असे मृताचे नाव आहे. या घटनेत पतीने चैतालीचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून तशी तक्रार चैतालीच्या वडिलांनी कागवाड पोलिसात दाखल केली आहे. चैताली आणि प्रदीप दोघेही उगार बुद्रुकचे रहिवासी आहेत. त्यांचा प्रेमसंबंधातून विवाह झाला होता. चैताली सध्या सात महिन्याची गर्भवती होती. अशा परिस्थितीत चैतालीस प्रदीप नेहमी घरी त्रास देत होता. तसेच तुझा मी खून करणार अशी धमकी देत होता, अशी माहिती चैतालीच्या पालकांनी दिली आहे. दि. 7 रोजी प्रदीपने चैतालीला दुचाकीवरुन घेऊन शिरगुप्पी गावाकडे नेले.
दरम्यान, लघुशंका करण्यासाठी प्रदीप थांबला. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव कारने चैतालीस जोराची धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. प्रदीपने चैतालीस धडक दिलेल्या कारमधून मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. चैतालीचे वडील अण्णासाब माळी यांनी सांगितले, सदर घटनाक्रम रचत प्रदीपने कार अपघातात चैतालीला ठार मारले आहे. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी अपघाताचे स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलिसात दिली आहे. तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक रामनगौडा बसरगी, डीवायएसपी प्रशांत मुनौळी, सीपीआय संतोष हळूर आणि पीएसआय राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. पती प्रदीप व कार चालक यांना अटक केली आहे. तसेच कार जप्त करून सखोल चौकशी सुरू केली आहे.