For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’!

03:10 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘उतावळा नवरा  गुडघ्याला बाशिंग’
Advertisement

4 कोटींची सोलर फेरीबोट ठरतेय पांढरा हत्ती: अविचारीपणा नडला, आता अन्य पर्यायांचा विचार

Advertisement

पणजी : ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ या म्हणीनुसार कोणताही अभ्यास आणि सारासार विचार न करता सरकारने तब्बल 4 कोटी ऊपये खर्च करून निर्माण केलेली राज्यातील पहिली हायब्रिड सोलर फेरीबोट आता प्रवासी वाहतुकीसाठी बिनकामाची ठरली असल्याचे नदी परिवहन खात्याच्या लक्षात आले आहे. केरळसारख्या अन्य राज्यांमध्ये अशा फेरीबोटी यशस्वीरित्या चालविण्यात येत आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये येथील काही राज्यकर्ते त्या राज्यात पर्यटनासाठी गेले असता त्यांनी त्या पाहिल्या. त्यांच्या मुलांनी आईकडे हट्ट धरावा तसा मुख्यमंत्र्यांकडे रेटा लावून 4 कोटी किंमतीची फेरीबोट बनवूनही घेतली. त्यानंतरऑक्टोबर 2022 मध्ये दिमाखदार सोहळ्यात तिचे उद्घाटनही करण्यात आले. त्यानंतर काही काळ तिच्या चाचण्या घेण्यात आल्या व त्यानंतर जी नांगरून ठेवली ती आजपर्यंत वापरात आणलेलीच नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

‘आधी कळस मग पाया’

Advertisement

अशा प्रकारे काही राज्यकर्त्यांचा उतावळेपणा राज्याच्या तिजोरीवर 4 कोटी ऊपयांना भारी पडला असून हा प्रकल्प जवळजवळ रद्दच झाल्यात जमा झाला आहे. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे या प्रकल्पाची सुऊवातच मुळात ‘आधी कळस मग पाया’ म्हणजेच ‘खास रॅम्प’ आदी सुविधा निर्माण न करताच उद्घाटन करण्यात आले होते. त्याही पुढे जाताना अशा फेरीबोटीसाठी लागणारे प्रशिक्षित तज्ञ चालकही खात्याकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे चाचणी काळात तिच्या निर्मात्या कंपनीकडील तज्ञ चालकांनीच ती चालविली होती. एकूणच अशा सावळ्या गोंधळामुळे सरकारची ही ‘नाव कधी किनाऱ्याला’ लागलीच नाही. आता तर ती फेरीबोट प्रवासी वाहतुकीसाठी व्यवहारिकदृष्ट्या उपयोगी ठरणार नसल्याचे लक्षात आले आहे.

‘पांढरा हत्ती’ ठरलेला प्रकल्प

सुमारे 4 कोटी खर्च केल्यानंतरही सदर फेरीबोट कुचकामी ठरण्यामागे प्रमुख कारण म्हणजे त्यातून केवळ प्रवासी वाहतूक करता येते. दुचाकी आणि चारचाकी वाहने सामावता येत नाहीत. ज्या पणजी-चोडण मार्गावर ही फेरीबोट चालविण्यात येणार होती तो मार्ग म्हणजे राज्यातील सर्वात व्यस्त आणि गर्दीच्या मार्गांपैकी एक आहे. सध्या या मार्गावर उण्यापूऱ्या सहा फेरीबोटी वाहतूक करत असतात आणि त्यात अतिशयोक्ती वगळल्यास ‘प्रवाशांपेक्षा वाहनेच जास्त’ असतात, असे चित्र नेहमी दिसून येते. अशावेळी केवळ प्रवाशांसाठी बांधलेल्या फेरीबोटीचा लोकांकडून वापर होणे अशक्यच होते. परिणामी सदर फेरीबोटीच्या उपयुक्ततेवर मर्यादा आल्या असून नाही म्हटले तरीही सध्या तो प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ च ठरला आहे.

आता अन्य पर्यायांचा विचार

दरम्यान, अशाप्रकारे सदर प्रकल्प ‘रद्द’ करण्याच्या निर्णयाप्रत नदी परिवहन खाते आलेले असले तरी तो ‘रद्दीत’ मात्र टाकण्यात येणार नाही, हे निश्चित आहे. या फेरीबोटीचा आता पर्यटनाच्या दृष्टीने वापर करण्याचा विचार खात्याने चालविला आहे. त्यासंबंधी शक्याशक्यतांचा अभ्यास सध्या चालू असून प्रसंगी सदर फेरीबोट एखाद्या खाजगी ऑपरेटच्या ताब्यात देण्याचाही अन्य एक विचार पुढे आला आहे, या निर्णयाला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Advertisement
Tags :

.