Solapur : पतीस मारहाण करून पत्नीच्या गळ्यातील दागिने नेले हिसकावून !
सांगोल्यात रस्त्यातच दरोडा ; चोरटयांनी केलं मंगळसूत्र लंपास
सांगोला : दुचाकीवरील अनोळखी तिघांनी दुचाकीवरील पतीस सत्तूरने मारून जखमी करून पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कटफळ गावच्या शिवारात दुधाळवाडी पाटी ते लांडा महादेव मंदिर रोडवरील फॉरेस्टच्या बाजूला कटफळ (ता. सांगोला) येथे घडली आहे.
वैभव अर्जुन ढेरे (वय २६, रा. खवासपूर, ता. सांगोला) हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पत्नी स्वाती व मुलगा विराज असे दुचाकीवरून (एमएच ४५- एव्ही ०६४२) घरी जात होते. त्यांची दुचाकी कटफळ गावच्या शिवारात दुधाळवाडी पाटी ते लांडा महादेव मंदिर रोडने फॉरेस्टच्या बाजूला रोडवर आली असता मागून युनीकॉर्न गाडीवरून (एमएच ११-डीएम ९९८६) अनोळखी तीनजण आले.
त्यातील मध्यभागी बसलेल्या एकाने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी सत्तूरने फिर्यादी वैभव ढेरे याच्या पाठीत मारून जखमी केले. गाडीच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पत्नी स्वाती हिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण हिसकावून घेऊन शिवीगाळी, दमदाटी करून निघून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वैभव ढेरे यांनी फिर्याद दाखल केली.