मांजा दोऱ्याने कापल्याने पती-पत्नी गंभीर जखमी
प्रतिनिधी/ निपाणी
येथील महामार्गावर खरी कॉर्नर शिरगुपी रोडनजीक पतंगाचा मांजा दोरा कापल्याने दुचाकीवरून जात असलेले पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज सागर मांगले (वय-22) व साक्षी सागर मांगले (वय-23 रा. हनिमनाळ ता. गडहिंग्लज) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. पृथ्वीराज मांगले व साक्षी मांगले हे दोघेजण दुचाकीवरून जात होते.
दरम्यान निपाणी खरी
कॉर्नर शिरगुप्पी रोड येथे महामार्गावर आल्यानंतर पतंगाचा मांजा दोरा कापल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार काडगवडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेसंदर्भात निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद यांनी सांगितले की, निपाणीतील पतंग विकणाऱ्या विक्रेत्यांनी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे मांजा विक्रीस बंदी आहे. तरी विक्रेत्यांनी हा मांजा दोरा विकू नये, तसेच युवकांनीही या मांजा दोऱ्याचा वापर टाळावा, असे आवाहन केले आहे.