सुसाईड नोट लिहून पती-पत्नी बेपत्ता
कारवार जिल्ह्यातील घटना : वनखात्यातील वरिष्ठांच्या छळाला वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
कारवार : वनखात्यातील वरिष्ठांच्या छळाला वैतागून रोजंदारी कर्मचारी (चालक) आणि त्याची पत्नी या दोघांनी नदीत उडी टाकून आत्महत्या करीत आहे. असा सुसाईट नोट लिहून बेपत्ता झाल्याची घटना जिल्ह्यातील होन्नावर येथे उघडकीस आली आहे. सुसाईड नोट 26 नोव्हेंबर रोजी लिहण्यात आली असून ते दांपत्य बुधवारपासून बेपत्ता झाले आहे. लहान मुलांना घरी सोडून बेपत्ता झालेल्या पती, पत्नीचे नाव मंजुनाथ नाईक आणि वीणा पुजारी (रा. करेकोण, ता. होन्नावर) असे आहे. या धक्कादायक आणि जिल्ह्यातील अरण्य खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजलेल्या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, 2014 पासून मंजुनाथ नाईक हे वनखात्यात रोजंदारी चालक म्हणून सेवा बजावत आहेत. सध्या ते होन्नावर तालुक्यातील वनखात्याच्या गिरसप्पा रेंजमध्ये सेवा बजावित आहेत.
गिरसप्पा रेंजमधील आरएफओपदी रुजू झालेल्या कार्तिक कांबळे यांनी नाईक यांना चालकपदाच्या सेवेतून हटवून स्वयंपाक करण्याची जबाबदारी सोपविली. नाईक यांनी कांबळे यांना आपली वाहन चालक म्हणून नेमणूक झाली आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकी म्हणून काम करणार नाही, असे सांगितले. आरएफओ नाईक यांना वाहन चालक होण्यास परवानगी देत नव्हते आणि नाईक स्वयंपाकी होण्यास तयार नसल्यामुळे नाईक यांची फार मोठी पंचाईत झाली.आरएफओ यांच्या छळाला कंटाळून नाईक यांची आपली व्यथा रोजंदारी कर्मचारी क्षेमाभिवृद्धी संघाचे राज्याध्यक्ष नागराज आणि चीफ कॉनझरवेटर ऑफ फॉरेस्ट यांच्या समोर मांडली. तरी सुद्धा आरएफओ कार्तिक कांबळे यांच्या भूमीकेत फार मोठा फरक पडला नाही. त्यामुळे कांबळे यांच्या छळाला वैतागलेल्या मंजुनाथ नाईक आणि त्यांची पत्नी वीणा पुजारी यांनी बुधवारी आपण नदीत उडी मारुत आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले आहेत.
नाईक यांच्या भावानी केली पोलिसांत तक्रार
नाईक दांपत्याचा सुसाईड नोट हाती लागल्यानंतर मंजुनाथ नाईक यांचे बंधू गोविंद नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात होन्नावर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. होन्नावर पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेवून चौकशीच्या कार्याला वाहून घेतले आहे. चौकशीतून काय निष्पन्न होणार याकडे होन्नावर तालुकावासीयांचे आणि वन खात्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.