अमेरिकेला धडकणार ‘मिल्टन’ चक्रीवादळ
लोकांमध्ये धास्ती वाढली : 5 लाख लोकांचे स्थलांतर
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
अमेरिकेत गेल्या 10 दिवसांत दुसऱ्यांदा मोठे वादळ धडकणार आहे. मिल्टन चक्रीवादळाचा फ्लोरिडाला मोठा फटका बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने याला सर्वात विनाशकारी वादळांच्या श्रेणी 5 मध्ये ठेवले आहे. या प्रकारात मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी होण्याचा धोका आहे. मिल्टन चक्रीवादळ गुरुवारी फ्लोरिडाच्या दाट लोकवस्तीच्या ‘टॅम्पा’ किनारपट्टीला धडकू शकते. ‘टॅम्पा’ची लोकसंख्या 3 दशलक्षाहून अधिक आहे. हे वादळ ‘टॅम्पा’ खाडीत पोहोचल्यानंतर कमकुवत होण्याची अपेक्षा आहे. यानंतर ते मध्य फ्लोरिडाहून अटलांटिक महासागराच्या दिशेने पुढे जाईल.
मिल्टन चक्रीवादळ सध्या मेक्सिकोच्या खाडीतून पुढे सरकले आहे. याप्रसंगी वादळाचा वेग ताशी 285 किमी इतका होता. ते फ्लोरिडा राज्याकडे निघाले आहे. वादळामुळे फ्लोरिडाच्या 67 पैकी 51 काऊंटीमध्ये आपत्कालीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. फ्लोरिडातील किनारी भाग रिकामा करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
फ्लोरिडाचे गव्हर्नर डी सँटिस यांनी लोकांना वादळापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लोकांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. या वादळामुळे फ्लोरिडामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येऊ शकतो. किनारी भागात 15 फूट उंचीच्या लाटाही उसळू शकतात. यापूर्वी हेलन चक्रीवादळ अमेरिकेला धडकले होते. यामध्ये 225 लोकांचा मृत्यू झाला होता